भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 06:55 AM2021-11-12T06:55:37+5:302021-11-12T06:56:12+5:30
अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
नवी दिल्ली : आपल्याला १९४७ जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ साली (भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर) मिळाले, असे वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यावर मुलाखतकर्त्या महिलेने म्हणून तर लोक तुम्हाला भगवान मानतात, असे उद्गार काढल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. तिचे हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
चारच दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कंगनाने आजपर्यंत अशीच अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. देशाला १९४७ जे मिळाले ती भीक होती, असे म्हणणे म्हणजे सर्व स्वातंत्र्यसेनानींचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर असे वक्तव्य केल्याबद्दल कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणीही काहींनी केली आहे. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी केेलेला त्याग व बलिदान याला भीक म्हणणे हा त्यांचाच नव्हे, तर तमाम भारतीयांचा अपमान आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांत तक्रार
काँग्रेस, भाजप, अकाली दर, कम्युनिस्ट अशा सर्व पक्षांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आम आदमी पार्टीने मुंबईत पोलिसांकडे तक्रार केली असून, कंगनाच्या वक्तव्याबद्दल तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भाजप खासदार वरुण गांधी यांनी केला निषेध
कंगना रणौतच्या या वक्तव्याचा भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, कधी महात्मा गांधी यांचा त्याग व तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा अपमान. याला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?
अकाली दल म्हणते ही मानसिक दिवाळखोरी
अकाली दलाचे वरिष्ठ नेते मनजिंदर सिरसा म्हणाले की, राणी लक्ष्मीबाईंची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने स्वातंत्र्याला भीक म्हणजे हे तिच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.