लडाखमध्ये पकडण्यात आलेल्या चिनी सैनिकाची घरवापसी; भारतीय लष्कराकडून सुखरुप पाठवणी
By कुणाल गवाणकर | Published: October 21, 2020 09:02 AM2020-10-21T09:02:26+5:302020-10-21T09:15:07+5:30
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधला तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वी चिनी लष्कराच्या एका सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं होतं. या सैनिकाची भारतीय सैन्याकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. काल रात्री भारतीय लष्करानं या सैनिकाला चिनी लष्कराच्या ताब्यात दिलं. भारतीय सैन्यानं चिनी सैनिकाची सुटका करावी, असं आवाहन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलं होतं. या आवाहनाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
काही गुराख्यांना रस्ता दाखवताना एका सैनिकानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि तो चुकून भारतीय हद्दीत गेला, असं चिनी लष्करानं म्हटलं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सैनिकाला पूर्व लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये पकडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करानं सोमवारी दिली. हा सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भटकताना आढळून आला. बुधवारी भारतीय लष्करानं या सैनिकाला चीनच्या ताब्यात दिलं.
Indian Army handed over the Chinese soldier Corporal Wang Ya Long to the Chinese Army at the Chushul Moldo meeting point, last night. pic.twitter.com/ZFROVSdhDz
— ANI (@ANI) October 21, 2020
भारतीय लष्करानं चिनी सैनिकाची सुखरुप पाठवणी केल्यानंतर चिनी सैन्यानं भारतीय जवानांचे आभार मानले. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमधील तणाव वाढला आहे. गलवान खोऱ्यातल्या हिंसक झटापटीनंतर या तणावात आणखी भर पडली. या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचंही मोठं नुकसान झालं. यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी तो उधळून लावला. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत-चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये आठपेक्षा जास्त वेळा बैठका झाल्या आहेत.