भारताने सेशल्सला दिले डॉर्नियर विमान, हिंदी महासागरात भारताचे महत्त्व वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 05:33 PM2018-06-26T17:33:06+5:302018-06-26T17:39:02+5:30
भारताने भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान सेशेल्सला दिले आहे.
नवी दिल्ली- भारताने हिंदी महासागरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागी असणाऱ्या सेशेल्सला दुसरे डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे. सागरी संकटांपासून वाचण्यासाठी या विमानाचा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी सेशेल्सला या विमानाची मदत होणार आहे. कालच भारताचा सेशेल्समध्ये नौदल तळ उभारण्यासाठी सकारात्मक बोलणी होऊन हा प्रलंबित मुद्दा मार्गी लागला आहे. भारताचे पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये काल विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Proud testimony of our long-standing friendship! On behalf of the people of India, EAM @SushmaSwaraj handed over HAL made Dornier Aircraft Do-228 to President of #Seychelles Danny Faure. The aircraft will enhance surveillance capability of Seychelles to tackle maritime threats. pic.twitter.com/ttluwjGw8j
— Raveesh Kumar (@MEAIndia) June 26, 2018
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे विमान सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी फॉरे यांच्याकडे आज सुपूर्द केले. फॉरे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. हे विमान सेशेल्सला सागरी संकटांचा सामना करण्यासाठी वापरता येईल, आमच्या पंतप्रधानांनी सेशेल्सला मार्च 2015मध्ये भेट दिली होती त्यावेळेस या भेट म्हणून आणखी एक डॉर्नियर विमान देण्याची घोषणा केली होती. असे सुषमा स्वराज यांनी यावेळेस सांगितले.
Relationship which is deep-rooted & historical! EAM @SushmaSwaraj calls on President of #Seychelles Danny Faure in New Delhi. Good discussion on expanding bilateral cooperation in all areas, specially capacity building, human resource development and people-to-people contacts. pic.twitter.com/VNl7LCmFoE
— Raveesh Kumar (@MEAIndia) June 25, 2018
भारताने हे विमान देण्याचे आश्वासन पूर्ती करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे. जून 29 रोजी सेशेल्सचा राष्ट्रीय दिन आहे. हे विमान सागरी संकटांपासून बचाव करण्यासाठी सेशेल्सला उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी आपले मत मांडले. तत्पुर्वी या दोन्ही नेत्यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. काल नौदलाचा तळ उभारण्यासंदर्भात झालेल्या करारानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते,'' भारत आणि सेशल्स प्रमुख सामरिक सहकारी आहेत. आम्ही लोकशाहीच्या मुलभूत सिद्धांताचा सन्मान करतो.तसेच हिंदी महासागरात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.'' काल भारत आणि सेशल्समध्ये एकूण सहा करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच सेशल्सला आपली सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी दहा कोटी डॉलर कर्ज देण्याचे भारताने मान्य केले.