५ कोटी बेरोजगार घरी बसून; लोकांची अवस्था होतेय गंभीर; १८.७५ कोटी तरुण नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:11 AM2022-01-22T06:11:38+5:302022-01-22T06:13:37+5:30

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे.

India has 53 million unemployed people as of Dec 2021 | ५ कोटी बेरोजगार घरी बसून; लोकांची अवस्था होतेय गंभीर; १८.७५ कोटी तरुण नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत

५ कोटी बेरोजगार घरी बसून; लोकांची अवस्था होतेय गंभीर; १८.७५ कोटी तरुण नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतासारख्या विकसनशील देशासमोर सध्या बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे त्यात आणखी भर पडली आहे. एका नव्या अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या ५ कोटींपेक्षा अधिक झाली असून, यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
 ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात बेरोजगार झालेल्यांची संख्या ५.३ कोटींवर गेली आहे. यात महिलांची संख्या १.७ कोटी आहे. नोकरी गेल्याने बसून असणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक असून, त्या सतत नोकरी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सीएमआयईने दिलेल्या माहितीनुसार, सतत काम शोधूनही नोकरीची संधी मिळत नसल्याने घरी बसून असणाऱ्यांचा कोट्यवधी तरुणांचा आकडा चिंता वाढवणारा आहे.

शोधाशोध करूनही मिळेना नोकरी
अहवालानुसार, एकूण ५.३ कोटी बेरोजगारांपैकी ३.५ कोटी लोक सतत कामाच्या शोधात बाहेर पडत आहेत. यामध्ये जवळपास ८० लाख महिलांचा समावेश आहे. इतर १.७ कोटी बेरोजगारांची काम करण्याची इच्छा आहे, मात्र ते त्यासाठी म्हणावे तितके प्रयत्न करताना दिसत नाहीत. यामध्ये ५३ टक्के म्हणजे ९० लाख महिलांचा समावेश आहे. भारतात सध्या नोकरी मिळणे अतिशय अवघड झाले असून, ही एक मोठी समस्या झाली आहे, असे सीएमआयईने म्हटले आहे.

आकडेवारी बोलते...
एकूण बेरोजगार : ५.३ कोटी
महिला बेरोजगार : १.७ कोटी
नोकरी शोधण्यासाठी रोज बाहेर पडणारे : ३.५ कोटी
महिलांची संख्या : ८० लाख

भारत जागतिक दर्जाच्या खाली
जागतिक बँकेच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर नोकरी मिळण्याचा दर कोरोना महामारीच्या अगोदर ५८ टक्के होता, तो कोरोना आल्यानंतर कमी झाला आहे. २०२० मध्ये जगभरात ५५ टक्के लोकांना नोकरी मिळत असताना भारतात मात्र, केवळ ४३ टक्के लोकच नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले.  सध्या भारतात केवळ ३८ टक्के लोकांनाच रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

महिलांना कमी संधी
भारताला समृद्ध अर्थव्यवस्था बनविण्यासाठी देशातील जवळपास ६० टक्के लोकसंख्येला रोजगार देणे आवश्यक आहे. जागतिक दर्जा मिळविण्यासाठी देशात सध्या १८.७५ कोटी नागरिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. याच्यासह कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा हिस्साही वाढविण्याची गरज असल्याचे सीएमआयईने म्हटले आहे.

Web Title: India has 53 million unemployed people as of Dec 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.