देशात ५९ वाघ रेडिओ कॉलरधारी!
By Admin | Published: April 27, 2016 02:29 AM2016-04-27T02:29:43+5:302016-04-27T02:29:43+5:30
देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे
नवी दिल्ली : देशातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये ५९ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे आणि कॉलर लावल्यामुळे मिळणारी माहिती त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ३५ वाघांना रेडिओ कॉलर बसविण्यात आले आहे तर राजस्थानच्या दोन अभयारण्यात १४ वाघांना हे उपकरण लावण्यात आले आहे. या रेडिओ कॉलरची किंमत ते कुठल्या कामासाठी वापरले जात आहे त्यावर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तीन ते चार वर्ष चालणाऱ्या बॅटरीवर आधारित व्हीएचएफ रेडिओ कॉलरची किंमत २५ ते ३० हजार रुपयांपर्यत असते. हा कॉलर ठराविक क्षेत्रात वन्यजीवांवर नजर ठेवण्याच्या कामात येतो.
जीपीएस, अॅक्टिव्हिटी सेन्सर, मोर्टेलिटी सेन्सर, व्हीएचएफ, यूएचएफ, आॅटोमॅटिक ड्रॉप आॅफसारख्या आधुनिक रेडिओ कॉलरची किंमत तीन ते साडेचार लाख एवढी असते.
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणने (एनटीसीए) रेडिओ कॉलरमुळे वाघांना असलेल्या संभाव्य धोक्याचे कुठलेही मूल्यांकन केले नसल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.
पेंचमध्ये एका वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, पन्ना आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील सर्व वाघांना कॉलर लावण्यात आले असून ते मजेत आहेत. रेडिओ कॉलरच्या माध्यमाने वाघांबद्दल गोळा केलेली माहिती त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रदीर्घ काळ महत्त्वाची असते.