सुरक्षेसाठी योग्य कारवाईचा भारताला पूर्णपणे अधिकार- संरक्षणमंत्री राजनाथसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:58 AM2020-09-06T01:58:04+5:302020-09-06T07:13:09+5:30
लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला.
मॉस्को : चीननेभारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करून दोन्ही देशांत झालेल्या करारांचा भंग केला आहे. त्यामुळे चीनने आपले सैन्य पूर्णपणे माघारी न्यावे असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निक्षून सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी उचित कारवाई करणे हा आमचा हक्क आहे असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. तर आम्ही एकही इंच भूमी सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे.
लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या घटनेपासून भारत व चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या समस्येवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह व चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे यांच्यात शुक्रवारी मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. पण चीनने अडेलतट्टूपणाची भूमिका कायम ठेवल्याने या चचेर्तून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या बैठकीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे तसेच इतर देशांचे नेतेही रशियाच्या दौºयावर आले आहेत.या बैठकीनंतर चीनने एका पत्रकात म्हटले आहे की, सीमेवरील तणावास संपूर्णपणे भारतच जबाबदार आहे. आमच्या हक्काची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे असे चीनने म्हटले आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने म्हटले आहे की, सीमेवर चीनने आक्रमक भूमिका घेत अनेक हालचाली सुरू आहेत. या गोष्टींमुळे दोन्ही देशांतील करारांचा चीनने भंग केला आहे.
चीनकडून भारतीयांचे अपहरण
अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमाभागातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या पाच भारतीय नागरिकांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याची चर्चा आहे. ही घटना या राज्यातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील नाचो भागामध्ये शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.