भारताचा एकही शत्रू नाही... पाकिस्तान, चीन आहेत तरी कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 10:08 PM2017-08-07T22:08:28+5:302017-08-07T23:46:05+5:30
पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला
- परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे माहितीच नाही
नागपूर, दि. 7 - पाकिस्तानसोबत भारताचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. तर दुसरीकडे डोकलामच्या मुद्यावरून चीनकडूनदेखील युद्धाची भाषा करण्यात येत आहे. या देशांतील अनेक नेते भारताला शत्रूराष्ट्र मानतात. मात्र भारताच्या लेखी बहुतेक जगातील एकही राष्ट्र शत्रूराष्ट्र नाही. म्हणूनच की काय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे यासंदर्भात माहितीच उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे विचारणा केली होती. कुठले देश शत्रूराष्ट्राच्या यादीत आहेत आणि त्यांचा समावेश कधीपासून करण्यात आला आहे, हे प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून विविध देशांबाबत उत्तर देण्यात आली. मात्र बहुतांश उत्तरांत संबंधित माहिती उपलब्ध नाही किंवा ‘निरंक’ असे नमूद करण्यात आले आहे. अगदी पाकिस्तान, चीनसंदर्भातदेखील असेच उत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे की नाही, याची मंत्रालयाकडे माहिती नाही. तर चीनबाबत ‘निरंक’ असे उत्तर देण्यात आले आहे. बांगलादेशबाबतदेखील काहीच माहिती नसल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाºया दहशतवादी कारवाया, भारतातील नेत्यांनी उघडपणे दिलेला इशारा, चीनशी ताणले गेलेले संबंध व तेथील सैन्य आणि नेत्यांकडून येणाºया धमक्या या पार्श्वभूमीवरदेखील ही शत्रूराष्ट्र आहेत की नाही, याची माहिती नाही ही बाब बुचकळ््यात टाकणारी आहे.
आखाती राष्ट्रांत एकही शत्रू नाही
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरात बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, ब्रुनेई, इंडोनेशिया, तिमोर यांच्याबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर भूतान, म्यानमार, चीन ही शत्रूराष्ट्रं आहेत की नाही, याचे उत्तर ‘निरंक’ असे देण्यात आले आहे. आखाती राष्ट्रांत मात्र देशाचा एकही शत्रू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर अमेरिका व कॅनडा यांच्याशी अतिशय चांगले संबंध असल्याचे उत्तर देण्यात आले आहे.