उदार देशांच्या यादीत भारताला स्थान
By admin | Published: October 25, 2016 11:30 AM2016-10-25T11:30:24+5:302016-10-25T11:41:17+5:30
उदार लोकांच्या तुलनेत भारतालाही अव्वल यादीत स्थान मिळाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - उदार लोकांच्या तुलनेत भारतालाही अव्वल यादीत स्थान मिळाल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. अनोळखी लोकांना मदत करणे तसंच दान करणा-यांमध्ये भारतातीयांचा सहभाग जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून समोर येत असलेल्या घटनांमुळे देशात अस्थिरता तसंच वैचारिक दिवाळखोरी असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे मात्र या बातमीमुळे भारतीयांना नक्कीच दिलासा मिळेल.
चॅरिटी एड फाऊंडेशनने ही आकडेवारी जाहीर केली असून 2014 मध्ये भारत 106व्या स्थानी होता. मात्र 2015 मध्ये भारताने 91व्या स्थानी झेप घेतली आहे. अहवालानुसार 2015 मध्ये भारतातील 41 कोटी लोकांनी अनोळखी लोकांची मदत केली. जो आकडा 2014 मध्ये 33.5 कोटी होता.
तसंच एकूण 20 कोटी लोकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला होता. जो आकडा 2014 मध्ये एकूण 18.4 कोटी इतकाच होता. तर जिथे 2014 मध्ये 15.7 कोटी लोकांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं, तिथे 2015 मध्ये हा आकडा 20 कोटींवर गेला आहे.
उदार देशांच्या यादीत म्यानमार 70 टक्क्यांसहित सर्वात अव्वल स्थानी आहे. म्यानमारमध्ये 63 टक्के लोकांनी अनोळखींची मदत केली तर 91 टक्के लोकांनी दान केलं आहे. तसंच 55 टक्के लोकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडली. म्यानमारनंतर अनुक्रमे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, कॅनडा, इंडोनेशिया, युके, आयर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातचा नंबर लागतो.