"आमच्याविषयी बोलू नका, स्वतःचा रेकॉर्ड पाहा"; वक्फ कायद्यावरुन बोलणाऱ्या पाकला भारताने फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 22:34 IST2025-04-15T22:18:37+5:302025-04-15T22:34:55+5:30
वक्फ कायद्यावरुन टिप्पण्या करणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच सुनावले आहे.

"आमच्याविषयी बोलू नका, स्वतःचा रेकॉर्ड पाहा"; वक्फ कायद्यावरुन बोलणाऱ्या पाकला भारताने फटकारलं
Waqf Act: संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात आलं. या कायद्यावरुन देशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला असून २०० जणांना अटक करण्यात आली आहे. अशातच वक्फ कायद्यावरील टिप्पण्यांबद्दल भारतानेपाकिस्तानला कडक शब्दांत फटकारले आहे. आमच्या कोणत्याही मुद्द्यावर बोलण्याचा पाकिस्तानला अधिकार नाही असे भारताने म्हटलं आहे.
वक्फ दुरुस्ती कायद्यावर हास्यास्पद टिप्पण्या करणाऱ्या पाकिस्तानला भारताने योग्य उत्तर दिले आहे. नवीन वक्फ कायद्यावर पाकिस्तानने केलेली विधाने भारताने स्पष्टपणे नाकारली आहेत. मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानची विधाने निराधार असल्याचे म्हटलं. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत पाकिस्तानने केलेल्या निराधार आणि निराधार टिप्पण्या नाकारत असल्याचे म्हटले.
"भारत हा एक लोकशाहीवादी देश आहे आणि येथील कायदे पूर्णपणे संविधानानुसार बनवले जातात. भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही. इतरांना सल्ला देण्यापूर्वी, पाकिस्तानने स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष दिले पाहिजे, कारण त्यांचा स्वतःचा रेकॉर्ड खूपच खराब आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं.
Our response to media queries regarding comments made by Pakistan on Waqf Bill:
— Randhir Jaiswal (@MEAIndia) April 15, 2025
🔗 https://t.co/MOYdvb3it6pic.twitter.com/KwkU2flALr
दरम्यान, नवीन वक्फ कायद्यावरुन देशात वातावरण तापले आहे. या कायद्याच्या निषेधार्थ आंदोलन करताना अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष आणि अनेक मुस्लिम लीगने वक्फ कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देत सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या संदर्भातील अनेक याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, आम आदमी पक्षाचे नेते अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, जमियत उलेमा-ए-हिंदचे अर्शद मदनी, समस्त केरळ जमियतुल उलेमा, अंजुम कादरी, तैय्यब खान सलमानी, मोहम्मद शफी, मोहम्मद फजलूर रहीम आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) खासदार मनोज कुमार झा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.