धमकीची भाषा करणा-या चीनला भारताने सुनावले
By admin | Published: April 4, 2017 01:51 PM2017-04-04T13:51:15+5:302017-04-04T14:26:17+5:30
तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचलप्रदेश दौ-यावर आक्षेप घेणा-या चीनला भारताने स्पष्ट शब्दात सुनावले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचलप्रदेश दौ-यावर आक्षेप घेणा-या चीनला भारताने स्पष्ट शब्दात सुनावले आहे. भारत चीनच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याप्रमाणे चीनने सुद्धा भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करु नये असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेजन रिजीजू यांनी सांगितले. दलाई लामा धार्मिक गुरु असून भारतात त्यांचा प्रचंड आदर केला जातो. त्यांच्याभोवती कुठलाही कृत्रिम वाद निर्माण करु नये असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आम्ही चीनच्या वन चायना पॉलिसीचा आदर करतो. त्याचप्रमाणे चीनने सुद्धा आमच्या धोरणांचा आदर करावा असे रिजीजू म्हणाले. अरुणाचलमधील जनतेला आपल्या शेजा-यांबरोबर चांगले संबंध हवे आहेत. दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवर चीनचे बारीक लक्ष आहे.
खराब हवामानामुळे या दौ-यामध्ये काही बदल झाले आहेत. दलाई लामांचा दौरा रद्द करावा यासाठी चीनने हरत-हेने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दलाई लामांच्या अरुणाचल दौ-यामुळे भारत-चीन व्दिपक्षीय संबंध बिघडतील अशी धमकी चीनने दिली. अरुणाचलप्रदेश तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे दलाई लामांच्या अरुणाचल दौ-याला चीनचा तीव्र विरोध आहे.