लष्करावर खर्च करणाऱ्या टॉप-५ देशांमध्ये भारत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:59 AM2018-05-03T04:59:41+5:302018-05-03T04:59:41+5:30
लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया टॉप-५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
नवी दिल्ली : लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया टॉप-५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. भारत आता अमेरिका आणि चीन यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. मात्र संरक्षण खात्याचा बहुतांशी खर्च वेतन व निवृत्ती वेतनावरच होतो.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१७ मध्ये भारताचा लष्करावरील खर्च ५.५ टक्क्यांनी वाढून ६३.९ अब्ज डॉलरवर गेला. भारताचा लष्करी खर्च आता फ्रान्सपेक्षा अधिक झाला आहे.
अहवालात म्हटले आहे की, जगाचा लष्करावरील खर्च अल्प प्रमाणात वाढून १.७३ लाख कोटींवर गेला आहे. हा खर्च जागतिक सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.२ टक्के आहे. लष्करावर सर्वाधिक खर्च करणाºया देशांत अमेरिका आणि चीनचा दबदबा कायम आहे. अमेरिकेचा लष्करावरील खर्च ६१0 अब्ज डॉलर तर चीनचा २२८ अब्ज डॉलर आहे.
सिप्रीने म्हटले की, चीन, भारत आणि सौदी अरेबिया यांचा लष्करावरील खर्च वाढल्यामुळे लष्करी समतोल आता आशिया, ओशिनिया आणि पश्चिम आशिया यांच्या बाजूने झुकला आहे. आशियात चीनचा लष्करी खर्च सर्वाधिक आहे.
चीनचा लष्करी खर्च २0१७ मध्ये जागतिक लष्करी खर्चाच्या तुलनेत वाढून १३ टक्के झाला. तो २00८ मध्ये ५.८ टक्के होता. लष्करी खर्च वाढल्यामुळे चीनचा वृद्धीदर कमी झाला आहे.
‘इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी’चे संशोधक लक्ष्मण कुमार यांनी सांगितले की, भारताचा लष्करी खर्च वाढला असला, तरी वाढीव तरतुदीतील बहुतांश निधी वेतन आणि निवृत्ती वेतनावरच खर्च होत आहे. भारतीय लष्कराच्या प्रत्यक्ष सेवेत १0 लाख ४0 हजार जवान असून, २0 लाख निवृत्ती वेतनधारक आहेत.