जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताने पटकावले ६६वे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:51 AM2018-11-01T05:51:06+5:302018-11-01T06:59:35+5:30
व्हिसामुक्त प्रवेशाला महत्त्व; सिंगापूर,जर्मनी ठरले अव्वल; अफगाणिस्तान सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी
नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे. या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.
नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे. संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.
भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (अॅक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे. केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे. २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९0 व्या स्थानी आहे. २९ देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया ८८व्या स्थानी, तर ३४ देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया ८७व्या स्थानी आहे.
असे ठरते मानांकन
सूत्रांनी सांगितले की, पासपोर्ट निर्देशांक अलीकडे अत्यंत उपयुक्त आॅनलाइन साधन बनले आहे. याद्वारे जगातील पासपोर्टची स्थिती नागरिकांना कळते. पासपोर्टची छाननी करून जागतिक पातळीवरील मानांकनही त्याद्वारे दिले जाते.
व्हिसामुक्त संपर्क अथवा आगमनानंतर व्हिसा (व्हिसा आॅन अरायव्हल) हे दोन निकषच त्यात प्रमुख आहेत. जेवढा पासपोर्ट शक्तिशाली तेवढा त्याचा व्हिसामुक्त संपर्क अधिक, असे साधे सूत्र यामागे आहे.