भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 08:37 AM2019-10-02T08:37:06+5:302019-10-02T08:39:11+5:30
पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण
भारत हे हिंदू राष्ट्र असून याबाबतीत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाला कोणत्याही विचारसरणीत बांधलं जाऊ शकत नाही. कारण संघ कोणत्याही विचारावर विश्वास ठेवत नाही, असंदेखील ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुनील आंबेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना मोहन भागवत यांनी त्यांचे विचार मांडले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विचारसरणीवर विस्तृत भाष्य केलं. 'संघाच्या विचारसरणीबद्दल काहीही भाष्य केल्यास ते चुकीचं ठरणार नाही. मी संघाला पूर्णपणे समजू शकतो, असं संघाचे संस्थापक असलेल्या डॉ. हेडगेवार यांनीदेखील कधी म्हटलं नाही. कित्येक वर्ष सरसंघचालक राहिल्यानंतर, आता मी कदाचित संघाला समजू लागलो आहे, असं गुरुजी म्हणाले होते,' अशी आठवण भागवत यांनी सांगितली.
संघात मतभेद असू शकतात, पण मनभेद नाहीत, असंदेखील भागवत म्हणाले. संघ उदारमतवादी संघटना आहे. संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची खास विषयांवर वेगवेगळी मतं असू शकतात. संघाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीचे प्रत्येक मुद्द्यांवरील विचार संघासारखेच असावेत, असं काही नाही. तसं असणं गरजेचंदेखील नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. भाजपाशी होणारे मतभेददेखील अतिशय सामान्य आहेत. मात्र आम्ही वादविवादांमधून नव्हे, तर सहमतीनं निर्णय घेण्याला महत्त्व देतो, असं त्यांनी म्हटलं.