रशियाच्या आकाशात भारताने फडकविला ‘जी-२०’ चा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 11:15 AM2023-09-10T11:15:22+5:302023-09-10T11:15:59+5:30
वाशिमकरांसाठी गाैरवाची बाब असल्याचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (जि. वाशिम) : १४ हजार फूट उंचीवर रशियाच्या आकाशात जी-२०चा ध्वज फडकवला अन् पश्चिम वऱ्हाडातील वाशिम जिल्ह्यातील रिसाेड तालुक्यातील गाेभनी येथे एकच जल्लाेष झाला. ज्या भारतीय स्कायडायव्हर्सच्या चमूने ही माेहीम फत्ते केली, त्यामध्ये या गावातील स्कायडायव्हर हिमांशू साबळेचा सहभाग असल्याने ही वाशिमकरांसाठी गाैरवाची बाब असल्याचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका चमूने माजी सैनिक, प्रसिद्ध विंगसूट पायलट अजयकुमार शर्मा यांच्या नेतृत्वात रशियाच्या आकाशात जी-२०चा ध्वज फडकवला. पथकात हिमांशू याच्याबरोबर अनामिका शर्मा, ऋषिकेश गौडा यांचाही समावेश होता.
श्वास रोखणारी मोहिम
जी-२० शिखर परिषद सुरू होण्यापूर्वी भारतीय स्कायडायव्हर्सच्या एका चमूने रोमांचक मोहिमेला सुरुवात केली होती. एकत्रितपणे त्यांनी १४ हजार फूट उंचीवर पोहोचून आकाशाकडे झेप घेतली आणि रशियामधील ढगांवर जी-२० ध्वज प्रदर्शित केला.