आता शत्रूची खैर नाही! जवाहिरीचा खात्मा करणारे ड्रोन लवकरच भारताकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:05 AM2022-08-22T08:05:06+5:302022-08-22T08:06:23+5:30
चीनलगतची सीमा व हिंद महासागरातील गस्त यंत्रणा भक्कम करण्यासाठी भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलर्सचे ३० एमक्यू-९बी प्रिडेटर आर्म्ड ड्रोन (सशस्त्र टेहळणी विमान) खरेदी करणार
नवी दिल्ली :
चीनलगतची सीमा व हिंद महासागरातील गस्त यंत्रणा भक्कम करण्यासाठी भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलर्सचे ३० एमक्यू-९बी प्रिडेटर आर्म्ड ड्रोन (सशस्त्र टेहळणी विमान) खरेदी करणार असून, भारताच्या याबाबत अमेरिकेसोबतच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यावर आहेत, अशी माहिती या व्यवहाराशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी रविवारी दिली.
एमक्यू-९ बी ड्रोन ही एमक्यू-९ रिपरची एक आवृत्ती आहे. अल्-कायदाचा नेता अयमान अल जवाहिरीचा गेल्या महिन्यात ज्या हेलफायर क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीने खात्मा करण्यात आला होता, त्या क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी रिपर ड्रोन वापरण्यात आले होते. हे ड्रोन खरेदी करण्यासाठी भारत व अमेरिकेत सरकारी पातळीवर बोलणी सुरू असल्याचे सांगून संरक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी या कराराबाबतची बोलणी
रद्द झाल्याची वृत्ते फेटाळून लावली.
ड्रोन खरेदीबाबत उभय सरकारांमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, असे जनरल ॲटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक लाल यांनी सांगितले.
एमक्यू-९बी ड्रोन खरेदीसाठी बोलणी अंतिम टप्प्यात
- ड्रोन सागरी गस्त, पाणबुडीवर हल्ला करू शकते. ते ३५ तासांहून अधिक काळ उडू शकते.
- ४ हेलफायर क्षेपणास्त्र आणि ४५० किलो बॉम्ब वाहून नेण्याची त्याची क्षमता.
- त्यामुळे ते तिन्ही सैन्यदलांसाठी खरेदी करण्यात येत आहे. याच्या एमक्यू-९बीच्या स्काय गार्डियन आणि सी गार्डियन अशा दोन आवृत्त्या आहेत.
तंत्रज्ञान पुरविण्याबाबत होणार चर्चा
ड्रोनची किंमत, सोबतची शस्त्रास्त्रे तसेच तंत्रज्ञान पुरवण्याशी संबंधित विविध मुद्दे सोडविण्यावर केंद्रित आहे.