भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:03 PM2024-01-08T12:03:39+5:302024-01-08T12:04:33+5:30
2019 Balakot Airstrike: पाकिस्तानी विमानांच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देतानाृ भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र या घटनाक्रमाबाबत काही स्फोटक माहिती समोर आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअरस्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र या घटनाक्रमाबाबत काही स्फोटक माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा पाकिस्तानमध्ये असलेले भारतीय उच्चायुक्त अजिय बिसारिया यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये तेव्हाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे. यातील काही उल्लेख हे स्फोटक आणि भारताने तेव्हा घेतलेल्या आक्रमक मुत्सद्देगिरीचे पुरावे आहेत.
या रिपोर्टनुसार तेव्हा भारताकडून कुठल्याही क्षणी क्षेपणास्त्र हल्ला होईल, या भीतीने पाकिस्तानची फे फे उडाली होती. पाकिस्तान सरकारने रातोरात बिसारिया यांच्याकडे धावन घेतली होती. तसेच चर्चेच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींसोबत चर्चा करू इच्छित होते.
२७ फेब्रुवारी २०१९ ची ती रात्र होती. पकडण्यात आलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याकडून पाकिस्तानच्या तुरुंगात घालवलेल्या रात्रींपैकी ही पहिली रात्र होती. त्या रात्री घडलेल्या घडामोडींबाबत खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, बिसारिया यांनी आपल्या पुढच्या पुस्तकातून भारताने तेव्हा दाखवलेल्या जबरदस्त मुत्सद्देगिरीचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
त्या दिवशी मध्यरात्री बिसारिया यांना भारताचे पाकिस्तानमधील तत्कालीन उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा फोन आला होता. त्यानंतर बिसारिया यांनी दिल्लीत फोन करून विचारणा केली आणि आता पंतप्रधान मोदी हे चर्चेसाठी उपलब्ध नसल्याचा आणि आवश्यक संदेशवहन हे उच्चायुक्तांच्या माध्यमातून होऊ शकते, असे सांगितले. त्यानंतर बिसारिया यांनी महमूद यांच्याशी पुन्हा चर्चा केली नाही.
त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांना मुक्त करण्याची घोषणा केली होती. तसेच शांततेसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत त्यांनी काही सविस्तर माहिती दिली नव्हती. पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेला शांतीचा संकेत असा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिनंदन यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी भारताने दिलेली धमकी किती गंभीर होती याचा उलगडा पाकिस्तानमधील अमेरिका आणि ब्रिटनच्या राजदुतांसह इतर पाश्चात्य मुत्सद्द्यांनी केला आहे.