पुढील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे डोनाल्ड ट्रम्प?; मोदी सरकारकडून आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:36 AM2018-07-13T07:36:34+5:302018-07-13T07:38:03+5:30
भारताच्या आमंत्रणावर अमेरिकन प्रशासनाकडून सकारात्मक विचार सुरू
नवी दिल्ली: पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. यासाठी मोदी सरकारकडून ट्रम्प यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. भारताच्या आमंत्रणाचा अद्याप अमेरिकन सरकारनं स्वीकार केलेला नाही. मात्र ट्रम्प प्रशासन या आमंत्रणाबद्दल सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर वारंवार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यास मोदी सरकारचा तो मोठा विजय असेल. भारताच्या आमंत्रणावर अमेरिकेनं प्रशासनानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प प्रशासनाकडून भारताच्या आमंत्रणाचा सकारात्मक विचार सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यावर भारताकडून ट्रम्प यांना आमंत्रण पाठवण्यात आलं.
याआधी 2015 च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रम्प यांनी भारताच्या आमंत्रणाचा स्वीकार केल्यास, त्यांची भारत भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण असेल. जगभरातील सर्व देश ट्रम्प यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ट्रम्प यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवणं इतर सर्वच देशांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर आहे. व्यापार शुल्क, इराणसोबत भारताचे ऐतिहासिक संबंध आणि उर्जा करार यांच्या पार्श्वभूमीवर भारतानं ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण दिलं आहे. याशिवाय भारतानं रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्रांसाठी करार केला आहे. त्यामुळेदेखील भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत.