भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:33 PM2024-05-13T21:33:41+5:302024-05-13T21:34:44+5:30
नवीन करारामुळे पाकिस्तान आणि चीनला बायपास करुन दक्षिण आशिया आणि मध्य आशियात व्यापारी मार्ग खुला होणार.
India-Iran Chabahar Port Deal :भारत आणि इराणमध्ये एक मोठा करार झाला आहे. हा करार इराणमधील चाबहार बंदराशी संबंधित आहे. या करारांतर्गत भारत पुढील 10 वर्षांसाठी इराणचे चाबहार बंदर हाताळणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. भारत-इराण संबंध आणि प्रादेशिक संपर्कासाठी हा करार ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी वर्णन केले. दरम्यान, या करारामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका बसला आहे. हा करार भारतासाठी किती महत्त्वाचा आहे, जाणून घ्या...
हा करार किती महत्त्वाचा आहे?
चाबहारमध्ये दोन बंदरे शाहिद कलंतरी आणि शाहिद भेष्टी आहेत. शिपिंग मंत्रालयाचे इंडिया पोर्ट्स ग्लोबल हे शाहिद बहिष्ती हाताळतात. या बंदराचे काम आधीपासून भारत हाताळत होता. पण हा अल्पकालीन करार होता. त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागायचे. मात्र आता 10 वर्षांसाठी दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. या दीर्घकालीन करार करण्याबाबत अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती.
At Tehran, Iran today, delighted to be part of the signing of the Long Term Bilateral Contract on Chabahar Port Operations in presence of HE Mehrdad Bazrpash, Minister of Roads & Urban Development, Iran.
— Sarbananda Sonowal (Modi Ka Parivar) (@sarbanandsonwal) May 13, 2024
India will develop and operate Iran's strategic Chabahar Port for 10… pic.twitter.com/iXwekIk8ey
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2016 मध्ये इराणला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी चाबहार बंदरासाठी $550 मिलियन खर्च करण्याची घोषणा केली होती. सध्या या कराराअंतर्गत इंडिया पोर्ट्स ग्लोबल चाबहार बंदरात सुमारे 120 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांमध्ये मालाची वाहतूक करता यावी, यासाठी भारत चाबहार बंदराचा एक भाग विकसित करेल. नवीन करारामुळे पाकिस्तानच्या कराची आणि ग्वादर बंदरांना बायपास करुन इराणमार्गे दक्षिण आशिया आणि मध्य आशियात व्यापारी मार्ग खुला होईल.
चाबहार बंदर किती महत्त्वाचे आहे?
2003 मध्ये इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहम्मद खतामी भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्यात भारत आणि इराणमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ज्यामध्ये चाबहार प्रकल्पाचाही समावेश आहे. चाबहार प्रकल्पात दोन स्वतंत्र बंदरे बांधली जात आहेत. भारत शाहिद बहिष्ती बंदरात गुंतवणूक करत आहे. चाबहार बंदराचे स्थान हे धोरणात्मक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. चाबहार हे इराणच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर आहे. चाबहार जिथे आहे, तिथे पाकिस्तानची सीमादेखील असू हे पाकिस्तानमध्ये बांधल्या जात असलेल्या ग्वादर बंदराजवळही आहे. चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत ग्वादर बंदर बांधण्यास सुरुवात केल्यामुळे चाबहार बंदराचे महत्त्व आपोआप वाढले आहे.
चीन-पाकिस्तानला झटका
इराणमध्ये बांधल्या जाणाऱ्या चाबहार बंदरामुळे चीन आणि पाकिस्तानला झटका बसणार आहे. ग्वादर बंदर चीनच्या हातात असल्यामुळे चाबहार बंदर भारताकडे असणे फायद्याचे आहे.
चाबहार बंदर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) शी जोडले जाईल. या कॉरिडॉर अंतर्गत भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमध्ये जहाजे, रेल्वे आणि रस्त्यांचे 7,200 किमी लांबीचे जाळे तयार केले जाईल. यामुळे युरोप आणि रशियामध्ये भारताचा प्रवेशही सुलभ होईल.