'संकुचित दृष्टीकोन सोडा...', अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर एस जयशंकर यांचे प्रत्तुत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 02:43 PM2024-05-15T14:43:51+5:302024-05-15T14:44:17+5:30
भारताने इराणसोबत चाबहार बंदराचा करार केल्यामुळे अमेरिकेला मिरची झोंबली आहे.
India-Iran Chabahar Port Deal : नुकताच भारत आणि इराणमध्ये एक मोठा करार झाला आहे. या करारांतर्गत पुढील 10 वर्षांसाठी इराणमधील चाबहार बंदराची जबाबदारी भारताकडे असेल. भारत, इराणसह अनेक देशांना या कराराचा फायदा होणार आहे. मात्र, काही देशांना मिर्चीही झोंबली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणाव सुरू आहे. अशातच अमेरिकने या करारावरुन भारताला नाव न घेता इशारा दिला.
अमेरिकेचा इशारा अन् जयशंकर यांचे चोख प्रत्युत्तर
चाबहार बंदरावरील करारानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिकेने भारताचे नाव न घेता म्हटले की, इराणशी द्विपक्षीय करार करणाऱ्या कोणत्याही देशावर आम्ही निर्बंध लादू शकतो. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवारी रात्री कोलकाता येथे त्यांच्या 'व्हाय भारत मॅटर्स' या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी त्यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. चाबहार बंदराबाबत झालेल्या करारावर लोकांनी आपला संकुचित दृष्टिकोन सोडला पाहिजे. चाबहार बंदराचा संपूर्ण क्षेत्राला फायदा होईल आणि त्याबाबत संकुचित दृष्टिकोन बाळगू नये, असे ते म्हणाले
जयशंकर पुढे म्हणाले, चाबहार बंदराशी आमचा दीर्घकाळापासून संबंध होता, परंतु आम्ही कधीही दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करू शकलो नाही. त्यावेळी विविध समस्या होत्या, आता त्या सर्व समस्या सोडवल्या आहेत. आता आम्ही दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करण्यास सक्षम आहोत.