भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर, मोदींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 10:15 AM2022-11-13T10:15:24+5:302022-11-13T10:16:31+5:30
India Economy: भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील रामगुंडम येथे केले.
हैदराबाद/विशाखापट्टणम : भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटेवर अग्रेसर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणातील रामगुंडम येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांचा दौरा केला. विविध विकास कामांचे उद्घाटन आणि शुभारंभ त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. रामगुंडम येथे उभारण्यात आलेल्या खत कारखान्याचा लोकार्पण समारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या वाटेवर अग्रेसर असल्याचे मत जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. १९९० नंतरच्या ३ दशकांत जेवढी प्रगती झाली, तेवढी प्रगती मागील काही वर्षांतच झाली आहे. मागील ३ वर्षांपासून कोरोना आणि युद्धस्थिती यामुळे जगाची अर्थव्यवस्था संकटात असताना भारत दमदार कामगिरी करीत आहे.