पंतप्रधान मोदींनी ओढली लक्ष्मणरेषा, २०४७ पर्यंत भारत गाठणार मोठं लक्ष्य! काय म्हणाले PM वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 05:01 PM2022-11-02T17:01:10+5:302022-11-02T17:02:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये आयोजित ग्लोबल इनव्हेस्टर्स मीटमध्ये (Global Investors Meet) ते बोलत होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील गुंतवणूक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असंही ते म्हणाले.
भारतात गुंतवणूक करणं म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील गुंतवणूक, स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणं ठरणार आहे, असं मोदी म्हणाले. गुंतवणूक आणि मानव संसाधनांवर लक्ष्य केंद्रीत करुन विकासाची लक्ष्य गाठण्यासाठी खूप मोठी मदत होईल असं मोदींनी सांगितलं.
स्टार्ट-अप इकोसिस्टमचं केलं कौतुक
पंतप्रधान मोदींनी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमबाबत बोलताना मुख्यत्वे कर्नाटक राज्याचं याबाबत कौतुक केलं. भारतातील १०० युनिकॉर्नमधील ४० तर एकट्या कर्नाटकातील आहेत. म्हणजेच त्यांचं मुख्यालय कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटक राज्य स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एक डबल इंजिन शक्ती आहे, असंही मोदी म्हणाले. भारताचं स्टार्टअप इकोसिस्टम जगात अमेरिका आणि चीनच्यानंतर नंतर जगात तिसऱ्या स्थानावर आहे.
आद्योगिक क्रांतीत भारतीयांची महत्वाची भूमिका
"मी गुंतवणुकदारांचं लक्ष मुख्यत्वे पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लानकडे केंद्रीत करू इच्छितो. या प्लाननं देशातील इन्फास्ट्रक्चरची निर्मितीची रुपरेषाच पूर्णपणे बदलली आहे. जग आज जेव्हा इंडस्ट्री ४.० च्या दिशेनं प्रवास करत आहे. यात औद्योगिक क्रांतीत भारतीय तरुणांची भूमिका आणि टॅलेंट पाहून जगही आश्चर्यचकीत झालं आहे", असं मोदी म्हणाले.
८ वर्षात ८० हजार स्टार्टअप्स
भारतात गेल्या ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. आज भारतातील प्रत्येक सेक्टर युवाशक्तीच्या ताकदीनं पुढे जात आहे. गेल्या वर्षी भारतानं रेकॉर्डब्रेक एक्सपोर्टची नोंद केली. कोरोनानंतरची परिस्थिती पाहता भारताची ही कामगिरी नक्कीच महत्वपूर्ण आहे, असंही मोदी म्हणाले. देशातील युवांच्या क्षमता वाढवण्यासाठी आम्ही इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये महत्वपूर्ण बदल केले. गेल्या काही वर्षात भारतात विद्यापीठं, टेक्नोलॉजी विद्यापीठं आणि मॅनेजमेंट विद्यापीठांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ केली आहे, असं मोदींनी सांगितलं.