आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्यांत ‘एअर बबल’ अंतर्गत वाढ?; मागणी वाढल्याने पर्यायांची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:04 AM2021-11-14T06:04:17+5:302021-11-14T06:04:36+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यापासून हवाई वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बंदीमुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एअर बबल’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सेवा देण्यात अडचणी येत आहेत. केंद्र शासनाने अनेक देशांशी एअर बबल करार करून काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू ठेवली असली, तरी वाढत्या मागणीला सामावून घेण्यात अपयश येत आहे. एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्र सावरत असताना सेवाविस्तार करण्यात अपयश आल्यास दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे.
प्राप्त परिस्थितीत एअर बबल करार करून अधिकाधिक देशांत वाहतूक सुरू करणे, हा एकमेव मार्ग दिसत असल्यामुळे त्यादृष्टीने केंद्रीय पातळीवर पावले टाकली जात आहेत. त्यासाठी सर्व देशांशी चर्चा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एअर बबल म्हणजे काय?
कोरोना काळात दोन देशांमध्ये तात्पुरती वाहतूक सुरू करण्यासाठी एअर बबल करार केला जातो. त्याअंतर्गत परस्पर सामंजस्याने विमान सेवा दिली जाते. त्याचा दोन्ही देशांतील विमान कंपन्यांना फायदा होतो.
सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध तातडीने शिथिल होतील, अशी आशा नाही. त्यामुळे दुबई, सिंगापूर, फ्रान्स, यूके, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, कतार, सौदी अरेबिया, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाबरोबर असा करार करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.