'त्या' मुद्द्यांवरून भारत चीनविरोधात जाण्याची शक्यता; ड्रॅगनच्या शेपटीवर पाय ठेवणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 06:51 AM2020-06-19T06:51:40+5:302020-06-19T06:53:11+5:30
दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली.
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली: भारत-चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांत लष्कर व राजनयिक स्तरावर जोरदार हालचाली सुरू असून भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्त्री व चीनचे परराष्ट्र राज्यमंत्री लुओ झाहुई यांच्यात बीजिंगमध्ये झालेल्या भेटीनंतर राजनयिक चर्चेस सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही चर्चा केली. हल्ल्याबद्दल भारतानं अत्यंत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. लुओ झाहुई चीनचे भारतातील माजी राजदूत असून त्यांनीच स्वत:हून विक्रम मिस्त्री यांना चर्चेसाठी बोलावल्याचं समजतं.
दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती असली तरी प्रत्यक्षात तशी वेळ येण्याची शक्यता नसल्याची माहिती बीजिंग दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र भारत ६ जून रोजी झालेल्या बैठकीतील प्रस्तावावर ठाम आहे. त्यावेळी जैसे थे स्थिती बाळगण्यावर सहमती झाली होती.
आशिया उपखंडात भारताचा प्रभाव वाढतो आहे. सात वर्षांत राजनयिक संबंधामध्ये भारतानं बदल केले. चीन याच प्रभावामुळे काहीसा अस्वस्थ झाला आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांना भारतानं आश्रय दिला. मात्र चीनची दुखरी नस असलेला तैवान, हाँगकाँग येथील अल्पसंख्यांकावर होणारा अत्याचार व तिबेटवरून भारतानं आतापर्यंत चीनविरोधी भूमिका घेण्याचं टाळलं. मात्र यापुढे आमच्याकडून अशी अपेक्षा करू नका, इतक्य स्पष्ट शब्दांत राजनयिक चर्चेदरम्यान भारतानं स्पष्ट केलं होतं.
मुत्सद्देगिरीत भारताची सरशी
एका आयएफएस अधिकाऱ्यानं सांगितलं की, परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेनंतर भारतानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ६ जूनला ठरलेल्या भूमिकेचा उल्लेख केला; पण चिनी परराष्ट्र मंत्रालयानं जाणूनबुजून त्याचा उल्लेख टाळला. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत इथेच भारताची सरशी झाली. ६ जूनला नेमकं काय ठरलं, याचा उल्लेख वारंवार करूनच भारत आपली बाजू अजून ठामपणे मांडेल, असंही हा अधिकारी म्हणाला. स्थिती 'जैसे थे' ठेवण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. परंतु त्यानंतरही चिनी सैनिक या क्षेत्रातून मागे न हटल्यानं कर्नल संतोष त्यांना जाब विचारण्यास गेले. तेव्हाच चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला.