जुलै अखेरपर्यंत भारतात दररोज १ कोटी नागरिकांच्या लसीकरणाचं लक्ष्य : डॉ. रणदीप गुलेरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:46 PM2021-05-29T22:46:59+5:302021-05-29T22:48:34+5:30
Coronavirus vaccination : लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारताला लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, गुलेरिया यांचं वक्तव्य
भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचं उत्पादन वाढवावं लागेल, असं मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं. याशिवाय भारताला परदेशातून लसी खरेदी करण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचंही गुलेरिया म्हणाले. सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला होता. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गुलेरिया यांनी अनेक प्राधिकरणांऐवजी एकाच प्राधिकरणाशी व्यवहार करण्यास उत्पादकांचे प्राधान्य असल्याचे सांगून लस खरेदीसाठी 'समग्र तोडगा' काढण्यावर भर दिला. एनडीटीव्ही इंडियाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यापूर्वी दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यांना परदेशातील कंपन्यांनी थेट लसी पुरवण्यास नकार दिला होता. यासंदर्भात त्यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी केवळ केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याचा आपल्या धोरणाचा हवाला दिला.
गर्भवती महिलांचं लवकर लसीकरण व्हावं
"गर्भवती महिलांमध्ये आजार आणि मृत्यू दराचं प्रमाण अधिक असतं, म्हणून त्यांना लवकरात लवकर लसीकरण करायला हवं," असं गर्भवती महिलांच्या लसीकरण अभियानाबाबत बोलताना गुलेरिया म्हणाले. "जागतिक आकडेवारीनुसार गर्भवती महिलांवरील लसींचे फायदे त्यांच्या नकारात्मक परिणामापेक्षा जास्त आहेत. कोवॅक्सिन ही लस निष्क्रीय विषाणूपासून तयार करण्यात आलेली आहे. तसंच ती फ्लूच्या लसीप्रमाणे आहे. या प्रकार गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असायला हवा," असंही त्यांनी नमूद केलं.
मल्टीविटामिन आणि झिंक प्रतिकारशक्ती बूस्टरच्या वापराविषयी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देताना एम्सच्या प्रमुखांनी सांगितले की, "त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, तरीही ते मोठ्या कालावधीसाठी घेऊ नये. त्याऐवजी लोकांनी उत्तम अन्न आणि हे घटक असलेला आहार घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.