CoronaVirus News: कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट्सचा धोका वाढला; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:22 PM2021-06-30T14:22:06+5:302021-06-30T14:23:51+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे धोका वाढला
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात दुसरी लाट आली. आता तोच डेल्टा व्हेरिएंट म्युटेट होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. याच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोदी सरकार लवकरच कोरोना चाचण्यांचे नियम बदलण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट धोका असल्यानं सरकारकडून लवकरच कोरोना चाचण्यांचे नियम बदलले जाऊ शकतात. नियमांमध्ये बदल करण्यात आल्यानंतर चाचण्यांमध्ये लक्षणं असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. वैद्यकीय पूर्वइतिहास आणि लसीकरणाच्या स्थितीऐवजी लक्षणं विचारात घेऊन कोरोना चाचण्या घेतल्या जातील. सरकारकडून केले जाणारे बदल जागतिक आरोग्य संघटनेच्या आदेशांनुसार केले जाणार आहेत. कोरोना चाचण्यांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतीच नियमावली प्रसिद्ध केली आहे. 'द मिंट'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
देशात आतापर्यंत ३२ कोटी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यातील जवळपास पाच कोटी लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. दोन्ही डोस घेतलेले लोक चाचणी करून घेण्यात फारसा रस दाखवत नाहीत. मात्र अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतानाही कोरोनाची लागण होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेचे दिशानिर्देश काय?
जर संसाधनांची संख्या मर्यादित असेल आणि लक्षणं नसलेल्या सर्वांच्या चाचण्या शक्य नसतील तर कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्यांच्या चाचण्या करायला हव्यात अशी जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली सांगते. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या व्यक्ती, लक्षणं असलेले नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना संघटनेनं दिल्या आहेत.