क्षेपणास्त्र प्रसारबंदी गटात भारत
By admin | Published: June 28, 2016 06:02 AM2016-06-28T06:02:03+5:302016-06-28T06:02:03+5:30
‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.
नवी दिल्ली : व्यापक संहाराची अस्त्रे, क्षेपणास्त्रे व हवेतून जमिनीवर मारा करू शकणारी मानवरहित विमाने यांचा प्रसार रोखण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) या आंतरराष्ट्रीय गटात भारताला सोमवारी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश मिळाला. या गटाचा भारत ३५ वा सदस्य आहे.
संहारक शस्त्रास्त्रे व त्यांचे तंत्रज्ञान यांच्या प्रसारबंदीसाठी स्थापन झालेल्या कोणत्याही बहुराष्ट्रीय संघटनेत भारत सहभागी होण्याची ही पहिली वेळ आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी रोखण्यासाठी अणुतंत्रज्ञान व त्यासाठीची साधनसामुग्री यांच्या हस्तांतरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या ‘न्यूक्लियर स्लापयर्स ग्रुप’ (एनएसजी) या ४७ देशांच्या संघटनेचे सदस्यत्व, चीनने खोडा घातल्याने भारताला मिळू शकलेले नाही. भारताला आता मिळालेले ‘एमटीसीआर’चे सभासदत्व हे तूर्तास दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे मानायला हवे.
अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नसल्याने भारताला ‘एनएसजी’चे सदस्यत्व देण्यास चीनने जोरदार विरोध केला व निकष शिथिल करून भारताला प्रवेश द्यायचा असेल, तर पाकिस्तानलाही तोच न्याय लावावा लागेल, असा आग्रह धरला. चीन ‘एमटीसीआर’चा सदस्य नाही. दोन नौदल सैनिकांना अटक झाल्यानंतर पूर्वी इटलीने भारताच्या या गटातील प्रवेशास विरोध केला होता, परंतु ते दोन्ही नाविक स्वदेशी परतल्याने इटलीचा विरोध मावळला. या संघटनेचा सदस्य झाल्याने भारतास इतर देशांकडून प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळू शकेल व त्यासाठी रशियाशी औपचारिक सहकार्य करता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताचा हा प्रवेश आंतरराष्ट्रीय प्रसारबंदीचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास परस्पर फायदेशीर ठरेल. भारत आपल्या सदस्यत्वाला पाठिंबा देणाऱ्या एमटीसीआरच्या अन्य ३४ सदस्य देशांचा आभारी आहे. - प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय