भारत-थायलंड महामार्गाचे 70% काम पूर्ण, मोदी सरकार 'या' पॉलिसीमुळे चीनला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 06:06 PM2023-06-28T18:06:44+5:302023-06-28T18:08:52+5:30
India Myanmar Thailand Highway: भारतातून थेट थायलंडला जाणाऱ्या महामार्गाये काम प्रगतीपथावर आहे. मोदी सरकारने 2014 मध्ये याचे काम सुरू केले होते.
India Myanmar Thailand Highway: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारत ते चीन या एकमेव स्टिलवेल रोडच्या धर्तीवर आशियाई महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम बंगालच्या कोलकत्यातून सुरू झालेला महामार्ग, मणिपूरद्वारे म्यानमार आणि तिथून थेट थायलंडला जाईल. हा मोदी सरकारच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा सर्वात मोठा प्रकल्प असून, याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मीडियाशी बातचीतमध्ये सांगितले की, ते कामाची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. ताजी परिस्थिती अशी आहे की, या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. गडकरी म्हणाले की, या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु मणिपूरमधील बिघडलेल्या वातावरणामुळे काही समस्या येत आहेत, त्या लवकरच दूर केल्या जातील.
कधी पूर्ण होईल?
हा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून, त्यानंतर भारतातूनथायलंडला जाणे सोपे होईल. लोक फ्लाइटऐवजी कारने थायलंडला जाऊ शकतील. भारत-म्यानमार आणि थायलंड महामार्ग हे तिन्ही देश मिळून बांधत आहेत. याची एकूण लांबी सुमारे 1400 किलोमीटर आहे. तत्कालीन वाजपेयी सरकारने हा प्रकल्प प्रस्तावित केला होता, मात्र तो केवळ कागदावरच राहिला. त्यानंतर 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू झाले.
असा असेल मार्ग
तीन देशांना जोडणारा हा महामार्ग कोलकात्यापासून सुरू होऊन सिलीगुडीपर्यंत जातो आणि त्यानंतर बंगालच्या श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करतो. आसाममधून दिमापूर आणि नागालँडचा प्रवास केल्यानंतर, हा मार्ग मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेह नावाच्या ठिकाणाहून परदेशात म्हणजेच म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारमधील बागो आणि यांगून मार्गे प्रवासी थायलंडमध्ये प्रवेश करतील.
चीनला मोठा धक्का बसणार
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर भारताच्या ईशान्य भागातील अर्थव्यवस्था सुधारेल, असा विश्वास आहे. यासोबतच चीनला मोठा धक्का बसणार आहे. चीनचा व्यापार आशियाई देशांमध्ये पसरला आहे, पण जेव्हा भारताचा या देशांशी संपर्क वाढेल, तेव्हा या देशांचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल आणि अनेक देश भारताकडे वळतील.