भारताला हवे शेजाऱ्यांशी मधुर संबंध
By Admin | Published: September 21, 2015 11:39 PM2015-09-21T23:39:04+5:302015-09-21T23:39:04+5:30
भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत
सांबा (जम्मू-काश्मीर) : भारत मुळीच साम्राज्यवादी नाही. भारताला केवळ आपल्या शेजाऱ्यांशी मधूर संबंध हवे आहेत. विशेषत: पाकिस्तान आणि चीन यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावरच भारताचे प्रयत्न राहिले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी केले.
चीन व पाकिस्तान सीमेलगतच्या अग्रणी भागांच्या तीन दिवसीय दौऱ्यास प्रारंभ करीत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमावाद आणि दहशतवाद यासह सर्व मुद्यांवर केवळ चर्चेतून तोडगा निघू शकतो, असेही ते म्हणाले.
भारत देश मुळीच साम्राज्यवादी नाही. भारत केवळ आपल्या सीमांची सुरक्षा करू इच्छितो. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि हल्ले थांबावे, हाच भारताचा प्रयत्न आहे व यापुढेही राहील.
भारताच्या शेजाऱ्यांनी ही भूमिका समजून घ्यायला हवी. आम्ही शांतताप्रिय आहोत, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)