काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला हवे स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्य
By admin | Published: October 7, 2016 02:19 AM2016-10-07T02:19:34+5:302016-10-07T02:19:34+5:30
काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले
नवी दिल्ली : काळ्या पैशाच्या मुद्यावर भारताला स्वित्झर्लंडकडून आणखी सहकार्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वीस कॉन्फेडरेशनच्या न्याय आणि आणि पोलीस विभागाच्या मंत्री सिमोनेता सोमारुगा यांच्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली.
सिमोनेता सोमारुगा या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यानिमित्त दोन्ही देशांनी काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्याचे निमित्त साधून राजनाथ सिंग यांनी भारताच्या भावना त्यांच्याकडे बोलून दाखविल्या. अधिकृत निवेदनाद्वारे नंतर ही माहिती माध्यमांना देण्यात आली.
निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग यांनी सोमारुगा यांना सांगितले की,
काळा पैसा हा भ्रष्टाचाराचा मुख्य
मुद्दा आहे. त्यामुळे त्यासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान दोन्ही
देशांत वाढायला हवे. स्वित्झर्लंडकडून भारताला अधिक सहकार्याची
अपेक्षा आहे.
याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी काही करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात राजनैतिक पासपोर्ट धारकांना व्हिसा सूट, बेकायदेशील आगमनाची ओळख पटविणे व त्यांना मायदेशी पाठविणे यासाठीचा तांत्रिक करार आणि राजनैतिक निर्वासिंतांच्या संबंधित व्यवस्थेबाबतचा एक करार यांचा समावेश आहे.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, शांती आणि प्रगती भविष्यासाठी समायिक विचाराच्या आधारावर भारत आणि स्वित्झरलँडने शांती आणि संपन्नतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बहुप्रवेश व्हिसाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा-
राजनाथ सिंग यांनी भारतीय व्यापाऱ्यांसाठी स्वित्झर्लंडकडे अधिक व्हिसा प्रणालीची मागणी केली. भारत स्वित्झर्लंडच्या व्यावसायासाठी अनेक वर्षांपासून बहुप्रवेश व्हिसा देण्याचा प्रस्ताव देत आला आहे. तथापि, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, असा आग्रह राजनाथ सिंग यांनी सोमारुगा यांच्याकडे धरला.