भारत असहिष्णू नाही -तस्लिमा
By admin | Published: February 8, 2016 03:25 AM2016-02-08T03:25:27+5:302016-02-08T03:25:27+5:30
भारत एक असहिष्णू देश आहे, असे मला अजिबात वाटत नाही, असे मत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे.
कोझीकोड : भारत एक असहिष्णू देश आहे, असे मला अजिबात वाटत नाही, असे मत बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे. जगातील सर्वच धर्म स्त्रियांना पक्षपाती वागणूक देतात. अशा स्थितीत केवळ भारतातील धर्मनिरपेक्ष लोकांकडून केवळ हिंदू कट्टरवाद्यांनाच का लक्ष्य केले जात आहे? असा सवालही त्यांनी केला.
केरळ साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी असहिष्णुता मुद्यावर आपली परखड मते मांडली. भारत असहिष्णू नाही. मात्र, काही लोक निश्चितपणे असहिष्णू आहेत. प्रत्येक समाजात काही असहिष्णू व्यक्ती असतात, असे त्या म्हणाल्या. खोट्या धर्मनिरपेक्षततेच्या आधारावर नांदणारी लोकशाही कधीही खरी लोकशाही ठरू शकत नाही, असे सांगत त्या म्हणाल्या की, स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे काही लोक मुस्लिम कट्टरवाद्यांकडे सरसकट दुर्लक्ष करीत केवळ हिंदू कट्टरपंथीयांनाच लक्ष्य करताना दिसतात.