आरोग्य मंत्रालयाकडून मोठा इशारा! ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 05:25 PM2021-12-17T17:25:30+5:302021-12-17T17:25:54+5:30
भारतातील 11 राज्यांमध्ये 101 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण.
नवी दिल्ली: आफ्रीकन देशात सापडलेल्या कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशात या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. भारतातही याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून, यांची संख्या 100च्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही महत्वाची माहिती दिली.
डेल्टाची जागा घेणार ओमायक्रॉन
आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना लव अग्रवाल म्हणाले की, ओमाक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत 32 प्रकरणे आढळून आली आहेत. तर, दिल्लीत 22 लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार आगामी काळात डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ शकतो.
दररोज 10 हजार कोरोना केसेस
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत देशातील एकूण ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. 11 राज्यांमध्ये 101 ओमायक्रॉन संक्रमित झाल्याची पुष्टी आहे. याशिवाय, मागील 20 दिवसांपासून दररोज 10,000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. परंतु आता या नवीन ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
इतर देशांतील भितीदायक आकडेवारी
जगातील अनेक देशांनी ओमायक्रॉनला घातक मानण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ब्रिटन आणि अमेरिकेत ओमायक्रॉनच्या नावाने लोक घाबरू लागले आहेत. Omicron ने UK मधील रेकॉर्ड मोडला असून, अमेरिकेतील परिस्थितीही सातत्याने बिघडत आहे. या देशांमध्ये प्रकरणे दुप्पट वेगाने वाढत आहेत.
ब्रिटनमधील परिस्थिती
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये गुरुवारी 883746 रुग्ण आढळल्याने येथे खळबळ उडाली आहे. बुधवारी आढळलेल्या बाधितांपेक्षा हा आकडा 10 हजारांनी जास्त आहे. म्हणजे बुधवारी ब्रिटनमध्ये सुमारे 78 हजार प्रकरणे आढळून आली होती. या वर्षी जानेवारीमध्ये यूकेमध्ये जवळपास 68 हजार प्रकरणे समोर आली होती. तर, ओमायक्रॉनची प्रकरणे 12 हजारांच्या जवळ पोहोचली आहेत. ही भयावहः आकडेवारी पासून आपल्याला आता सावध राहण्याची गरज आहे.