Omicron Variant: भारतात चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेतून परतलेले एकाच कुटुंबातील ४ जण पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:34 PM2021-12-03T19:34:33+5:302021-12-03T19:46:44+5:30
आतापर्यंत कुटुंबातील १२ नातेवाईकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचसोबत आता या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.
जयपूर – कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळल्यानंतर आता गुजरात आणि राजस्थानात काही संशियत सापडल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. जामनगर येथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे काही संशयित रुग्ण आढळले तर दक्षिण आफ्रिकेतून जयपूरला परतलेल्या एकाच घरातील ४ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे. या चौघांमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. या चौघांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पीडित कुटुंब फाटक परिसरात राहणारं आहे. काही दिवसांपूर्वीच हे चौघं भारतात परतले होते. या चारही जणांच्या नमुन्याची जीनोम सिक्वेसिंग करण्यास पाठवले आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये आई वडील आणि ८ आणि १५ वर्षाच्या दोन्ही मुली कोरोना संक्रमित आढळल्या आहेत. तपास रिपोर्टनंतर या चौघांमध्ये ओमायक्रॉन आहे की नाही हे कळणार आहे. परंतु एकाच कुटुंबातील ४ जण पॉझिटिव्ह आल्यानं चिंता पसरली आहे.
आतापर्यंत कुटुंबातील १२ नातेवाईकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचसोबत आता या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारताने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आतापर्यंत १२५ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. ७९ कोटी लोकांना लसीचा सिंगल डोस मिळाला आहे. लसीकरणाचा आकडा ओमायक्रॉन संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण WHO नं ओमायक्रॉन रोखण्यासाठी लसीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्यास सांगितले आहे.
भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव
आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. हे दोन्ही रुग्ण ६६ आणि ४६ वर्षाचे आहेत. दोघांनीही लसीचे डोस घेतले होते. या दोन्ही रुग्णात कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यातील एक व्यक्ती भारतातून दुबईला गेला आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉननं संक्रमित रुग्ण आढळले आहेत. WHO ने व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये ओमायक्रॉनचा समावेश केला आहे. सर्वात पहिले दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले होते.