मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:42 AM2019-12-10T01:42:06+5:302019-12-10T01:42:21+5:30
१८९ देशांत भारत १२९ व्या स्थानावर
नवी दिल्ली : भारत २०१९ वर्षामध्ये मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) १८९ देशांत एक पायरी वर चढून १२९ व्या स्थानी आला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे.
गेल्यावर्षी भारताचे हे निर्देशांक मूल्य ०.६४७ होते व त्यामुळे भारत १३० व्या स्थानी होता. २००५-२००६ ते २०१५-२०१६ या कालावधीत भारतात दारिद्र्यातून २७.१ कोटी लोकांना वर काढण्यात आले, असे यूएनडीपीच्या भारताच्या निवासी प्रतिनिधी शोको नोदा यांनी हा अहवाल (बियोंड इन्कम, बियोंड अॅव्हरेजेस, बियोंड टुडे : इनइक्वालिटिज इन ह्यूमन डेव्हलपमेंट इन द टष्ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी) प्रकाशित करताना म्हटले.
या कालावधीत संपूर्ण दारिद्र्यात नाट्यमय घट झाली, त्याचसोबत जीवनमान, शिक्षण वाढले आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. या निर्देशांकानुसार मानव विकासाच्या प्रगतीत इतर कोणत्याही प्रांताचा असा अनुभव नाही, असे त्या म्हणाल्या.
१९९० ते २०१८ या कालावधीत दक्षिण आशियाची वेगाने (४६ टक्के) वाढ झाली. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिकची ४३ टक्क्यांनी वाढ झाली.
तीन दशकांपासून वेगाने विकास
भारताने विकासासाठी आर्थिक समावेशन (प्रधानमंत्री जन धन योजना), सर्वांसाठी आरोग्य सेवा (आयुष्मान भारत) आदींत घेतलेला पुढाकार हा कोणीही मागे राहू नये आणि पंतप्रधानांचा सर्वांसाठी विकास हा दृष्टिकोन साकारण्याचे जे आश्वासन दिले गेले होते ते पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे होते, असे शोको नोदा म्हणाल्या. त्यांनी म्हटले की, भारताची सतत सुरू असलेली प्रगती ही जवळपास तीन दशकांच्या वेगाने झालेल्या विकासामुळे आहे.