I.N.D.I.A मधून NDA त येताच JDUचे काँग्रेसवर गंभीर आरोप, केला सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 01:45 PM2024-01-28T13:45:53+5:302024-01-28T13:46:28+5:30
Bihar Political Update: लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष पुन्हा एकदा एनडीएमध्ये दाखल झाला आहे. नितीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपाविरोधात उभ्या राहत असलेल्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तसेच बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला परत एकदा विरोधात बसावे लागणार आहे. दरम्यान, इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये दाखल झाल्यानंतर जेडीयूचे दिग्गज नेते के.सी. त्यागी यांनी काँग्रेसबाबत सनसनाटी दावा केला आहे. काँग्रेसला इंडिया आघाडीचं नेतृत्व बळकवायचं होतं. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करून काँग्रेसनं चाल खेळली होती. मात्र खर्गे यांनी नंतर नकार दिला होता. तसेच आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार बनणार नसल्याचे सांगितले होते.
के.सी. त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी सर्वांना सोबत घेऊन इंडिया आघाडीची बांधणी केली होती. देशभरात फिरून सर्वांना एकत्र आणले होते. इंडिया आघाडी पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा न करताच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे ठरवण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या मनात खोट होती. त्यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व हडपण्यासाठी खर्गेंचं नाव पुढे केलं होतं, असा दावा के. सी. त्यागी यांनी केला. इंडिया आघाडीत एकमत होत नसल्याने नितीश कुमार नाराज होते. काँग्रेसची भूमिका त्यांना खटकली होती.
जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी म्हणाले की, काँग्रेस प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जींचा पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, जेडीयू असो, वा शरद पवार यांचा पक्ष असो, हे सर्व पक्ष काँग्रेसशी लढूनच तयार झाले आहेत. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मागच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या एवढ्याही जागा मिळवता आल्या नव्हत्या. काँग्रेससमोर सध्या अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनू इच्छित होते. मात्र हे होऊ शकलं नाही, त्यामुळे ते नाराज झाले आणि अखेरीस आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपासोबत एनडीएमध्ये गेले, असा आरोप नितीश कुमार यांच्यावर होत आहे.