'इंडिया' आघाडीच्या लोगोचं मुंबईत अनावरण; सर्वांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 05:03 PM2023-08-24T17:03:32+5:302023-08-24T17:05:36+5:30
इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे.
नवी दिल्ली: विरोधी आघाडी I.N.D.I.A.ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्यामुंबईत होणाऱ्या बैठकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे. याबाबत आघाडीत सामील झालेल्या पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनुसार, या लोगोमध्ये तिरंग्याचे सर्व रंग असतील. भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा. हा लोगो इटालिक फॉन्टमध्ये असेल. या प्रक्रियेत आतापर्यंत एकूण ९ लोगो तयार करण्यात आले आहेत. मात्र बहुतांश पक्षांना यातील एकच लोगो आवडल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी ही शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत लागले आहेत. मुंबईतील ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
३१ ऑगस्ट रोजी लोगो जाहीर होईल
युतीच्या सर्व प्रमुख पक्षांना अंतिम लोगो दाखवला जाणार आहे. मुंबई सभेच्या सुरुवातीलाच लोगोवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असून ३१ ऑगस्टलाच लोगोचे अनावरण होणार आहे.
११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार
मुंबई बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या ११ सदस्यीय समितीमध्ये शिवसेना, सपा, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक या प्रमुख पक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल.
कोणताही जाहीरनामा नसेल
निवडणुकीत उतरताना या आघाडीचा कोणताही जाहीरनामा असणार नाही, हे विशेष. मात्र, निवडणुकीपूर्वी संयुक्त अजेंडा निश्चितपणे जाहीर केला जाईल. यावरही मुंबई बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबई बैठकीत 'इंडिया' युतीचा ६ सूत्री अजेंडा सामायिक केला जाईल.
ईशान्येतील काही पक्ष महायुतीत सामील होतील-
या बैठकीची माहिती देताना उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'इंडिया' आघाडीच्या आगामी बैठकीत नवीन लोगोचे अनावरण केले जाईल. त्यांच्या मते, या लोगोमध्ये भारताशी संबंधित एक झलक दिसेल. या लोगोमध्ये या देशाला एकसंघ राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. संजय राऊत यांनी सांगितले की, जगभरातील ३८ पत्रकार येणार आहेत. या बैठकीबाबत सर्वच पक्षांमध्ये उत्सुकता आहे. यासोबतच ईशान्येतील काही नवीन पक्षही आमच्या आघाडीत सामील होऊ शकतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.