Vaccination Update: कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे; सर्वाधिक लसीकरण करणारा जगातील पहिला देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 11:30 AM2021-06-28T11:30:59+5:302021-06-28T11:33:37+5:30
भारतानं कोरोना विरोधी लसीकरणात जागतिक महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेला मागे टाकलं आहे.
भारतानं कोरोना विरोधी लसीकरणात जागतिक महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेला मागे टाकलं आहे. सर्वाधिक लसीकरण करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. गेल्या २४ तासांत भारतात कोरोना लसीचे एकूण १७ लाख २१ हजार २६८ डोस देण्यात आले आहेत. यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ इतका झाला आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी कोरोना लसीकरणासंदर्भातील ट्विट करुन भारतानं केलेल्या विक्रमाची माहिती दिली आहे. मालवीय यांनी एक आकडेवारी मांडली असून यात अमेरिकेत १४ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. तर भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊनही आज देशानं अमेरिकेला मागे टाकलं आहे.
India overtakes US in Covid vaccination, even though they had a slight head start…
— Amit Malviya (@amitmalviya) June 28, 2021
Well done, team India. pic.twitter.com/ak2M2HNHxl
ब्रिटनमध्ये सर्वात पहिलं लसीकरणाला सुरुवात
जगात सर्वात आधी म्हणजेच ८ डिसेंबर रोजी ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९० करोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर इटलीमध्ये २७ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरवात होऊन आतापर्यंत ४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१ डोस देण्यात आले आहेत. यासोबत जर्मनीमध्ये आतापर्यंत ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये ५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८ लोकांचं लसीकरण झालं आहे.
भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६ हजार १४८ नवे रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २ लाख ७९ हजार ३३१ इतकी झाली आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ९६ हजार ७३० इतका झाला आहे. सध्या देशात ५ लाख ७२ हजार ९९४ सक्रीय रुग्ण आहेत.