'भारत-पाकिस्तान एकत्र आले तर जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:12 AM2018-04-04T11:12:51+5:302018-04-04T11:12:51+5:30
दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकत्र आले तर ती जगातील मोठी ताकद असेल, असे मत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मांडले. भारद्वाज यांनी कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (पीआयएफएफ) हजेरी लावली होती. त्यानंतर 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या नातेसंबंधावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मला पाकिस्तान हा देश खूप आवडतो. प्रत्येकवेळी या देशाने मला प्रेमच दिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध सुधारायचे असतील तर सांस्कृतिक आदानप्रदान महत्त्वाचे आहे. अधिकाअधिक सांस्कृतिक उपक्रमांद्वारे दोन्ही देशांतील दरी भरू काढता येईल. परंतु, दुर्दैवाने हे दोन्ही देश कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असतात. मुळात, भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक बाबतींमध्ये साम्य आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आल्यास सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ती जगातील मोठी ताकद असेल, असे भारद्वाज यांनी म्हटले.
साधारणत: दोन देशांमधील संबंध सुधारायचे असल्यास संस्कृती आणि राजकारण हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र, भारत व पाकिस्तानच्याबाबतीत राजकीय पर्याय सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान हा एकमेव दुवा उरला आहे. परंतु, सध्याच्या बिघडलेल्या राजकीय वातावरणामुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक संबंधांचेही नुकसान होत आहे. त्यासाठी दोन्ही बाजुंकडून सहिष्णुता आणि स्वीकारर्हतेचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. मात्र, हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्नही झाले पाहिजेत, असे विशाल भारद्वाज यांनी सांगितले.