भारत-पाकिस्तान चर्चा सध्यातरी अशक्यच
By admin | Published: March 5, 2017 08:30 AM2017-03-05T08:30:45+5:302017-03-05T08:30:45+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा होणे सध्यातरी अशक्यच असल्याचे चित्र आहे. सार्कच्या नव्या महासचिवांना दिेलेले समर्थन, पाकिस्तानी मच्छिमारांची सुटका आणि या महिन्यात लाहोर येथे होणाऱ्या सिंधू आयोगाच्या बैठकीत सिंधू आयुक्तांना पाठवण्याच्या भारताच्या निर्णयांमुळे भारताची पाकिस्तानबाबची भूमिका काहीशी सौम्य झाल्याचे संकेत मिळत होते. मात्र दहशतवादाच्या मुद्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास भारत तयार नसल्याने सध्यातरी दोन्ही देशांमध्ये उभयपक्षी चर्चा होणे कठीण दिसत आहे.
सरकरामधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तानच्या पाठबळाने सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून असेल. तसेच त्याआधारावरच आपल्या पुढील भूमिकेबाबत निर्णय घेईल. नियंत्रण रेषेवरील पर्वतीय भागात बर्फ विरघळल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून होणारी घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता माजवण्याच्या प्रयत्नांवर भारताची नजर असेल.
गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात झालेल्या आंदोलनांना पाकिस्तानची फूस होती. तसेच पठाणकोट, उरी आणि नागरोटा येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागेही पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले होते. मात्र असे असले तरी पाकिस्तानबाबत पूर्णपणे कठोर भूमिका घेऊन देन्ही देशातील संबंध अधिक ताणण्याची भारताची इच्छा आहे. त्यामुळे सामान्य बैठका तसेच कैद्यांची अदला बदली सुरू राहील.