India Pakistan: पाकिस्तानात कसं कोसळलं भारताचं 'सुपरसोनिक मिसाईल'? केंद्रानं दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:54 PM2022-03-11T20:54:19+5:302022-03-11T20:55:25+5:30
भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे."
भारतानेपाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहरात 9 मार्च रोजी पडलेल्या मिसाईलच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एका निवेदनात केंद्राने म्हटले आहे की, "9 मार्च 2022 रोजी, नियमित देखभालीदरम्यान, काही तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अचानक फायर झाले. भारत सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत."
भारत सरकारने म्हटले आहे की, “मिसाईल पाकिस्तानातील एका भागात कोसळल्याचे समजते. ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मात्र, या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही, हीही दिलासादायक बाब आहे. तत्पूर्वी गुरुवारी, भारताकडून एक मिसाईल आपल्या हद्दीत आले, असा दावा पाकिस्तानी सशस्त्र दलांनी केला होता.
यासंदर्भात, पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते की, त्यांनी भारतीय हवाई क्षेत्रातून पाकच्या हद्दीत येणाऱ्या मिसाईलचा शोध घेतला. ते पंजाब प्रांतात पडले आहे. तसेच, 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी वेगवान मिसाईल भारतीय हद्दीतून पाकिस्तानमध्ये घुसले आणि पंजाब प्रांतात कोसळले, असे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
मेजर जनरल इफ्तिखार यांनी म्हटले आहे की, संबंधित मिसाईल बुधवारी रात्री पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात मियां चन्नू परिसरात कोसळली. ती जमिनीवरून सोडली गेली होती. याची माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलाने शोध मोहीम सुरू केली होती. या मिसाईलमुळे मोठी दुर्घटनाही होऊ शकली असती, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.