India-Pakistan Talks: 6 वर्षानंतर भारत-पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:02 PM2022-07-22T15:02:49+5:302022-07-22T15:04:05+5:30
Shanghai Cooperation Organisation Summit: 15-16 सप्टेंबर रोजी समरकंद, उझबेकिस्तान येथे SCO शिखर परिषद होणार आहे, यात नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ सहभागी होणार आहेत.
India-Pakistan Talks: भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (SCO) सरचिटणीस झांग मिंग शुक्रवारी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान ते पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना 15-16 सप्टेंबर रोजी समरकंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या SCO वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित करणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिषदेत पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांची भेट होऊ शकते, असे मानले जात आहे.
6 वर्षात पहिली बैठक
द न्यूजने म्हटले की, गेल्या सहा वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची थेट भेट झालेली नाही. त्यामुळे आता या परिषदेत दोन्ही देशांचे पंतप्रधान भेटण्याची शक्यता आहे. जर दोन्ही पंतप्रधानांची भेट झाली, तर दोघांमध्ये सीमावाद आणि सुरक्षेसह इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
भारताने चर्चेचा प्रस्ताव दिला नाही
सूत्रांनी सांगितले की, भारताच्या बाजूने अद्याप पाकिस्तानला भेटीचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. पण, भारताने असा प्रस्ताव दिल्यावर पाकिस्तान त्या प्रस्तावाला नाकारू शकणार नाही. चीन, पाकिस्तान, रशिया, भारत, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि कझाकिस्तान हे या गटाचे सदस्य आहेत.
शिखर परिषदेत या मुद्द्यांवर चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, या शिखर परिषदेत संघटनेची क्षमता आणि अधिकार वाढवणे, आपापल्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे, देशातील गरिबी कमी करणे, यासोबतच अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे या मुद्द्यांवर चर्चा होईल.