कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:33 PM2022-11-30T15:33:52+5:302022-11-30T15:34:20+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहेत.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. यातच आता कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत घट झाल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 14 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (ब्रेंट) किमती जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहेत.
मे महिन्यानंतर पहिल्यांदाच दर कमी होणार
कच्च्या तेलाचे दर यूएस क्रूड प्रति बॅरल $ 74 च्या जवळ आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे भारतीय रिफायनरीजसाठी कच्च्या तेलाची सरासरी किंमत (भारतीय बास्केट) $82 प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे. मार्चमध्ये ही किंमत $112.8 होती. त्यानुसार, 8 महिन्यांत रिफायनिंग कंपन्यांसाठी कच्च्या तेलाच्या किमती $ 31 (27%) ने कमी झाल्या आहेत.
SMC ग्लोबलच्या मते, देशातील तेल कंपन्याना क्रूड ऑईलच्या $ 1 च्या घसरणीवर प्रति लिटर 45 पैसे बचत होते. त्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. पण, तज्ञांच्या मते ही संपूर्ण कपात एकाच वेळी होणार नाही.
भारत गरजेच्या 85% तेलाची आयात करतो
भारत आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्चे तेल बाहेरून खरेदी करतो. याची किंमत आपल्याला डॉलरमध्ये मोजावी लागते. अशा स्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. कच्चे तेल बॅरलमध्ये येते. एक बॅरल म्हणजे 159 लिटर कच्चे तेल.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे ठरवतो
जून 2010 पर्यंत सरकारने पेट्रोलचे दर निश्चित केले होते आणि ते दर 15 दिवसांनी बदलले जात होते. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत सरकार डिझेलचे दर ठरवत असे. 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.