चीनच्या नाकावर टिच्चून भारताने लडाखमध्ये टाकली पाइपलाइन
By admin | Published: November 6, 2016 06:58 PM2016-11-06T18:58:47+5:302016-11-06T18:58:47+5:30
चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी लडाखमधील डेमचोक भागात पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - चीनच्या नाकावर टिच्चून भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी लडाखमधील डेमचोक भागात पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. येथील रहिवाशांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी भारताकडून येथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. मात्र चीनने या कामास आक्षेप घेतल्याने भारतील लष्कर आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती.
चीनने डेमचोक भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ यावेळी पीपल्स आर्म्स पोलीस फोर्स (पीएपीएफला तैनात केले होते. मात्र सामान्यपणे येथे पीएलएचे सैनिक तैनात असतात. दरम्यान चिनी सैनिकांनी शुक्रवारी या भागात प्लॅस्टिकचे तंबू ठोकण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला होता. दोन्ही देशांचे सैनिक तीन दिवस समोरासमोर होते. अखेर ही तणावाची परिस्थिती शनिवारी निवळली. दरम्यान, चिनी सैन्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारतीय लष्कराच्या इंजिनियर्सनी एक किलोमीटर अंतराची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले.