सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:49 AM2020-01-15T07:49:27+5:302020-01-15T07:51:14+5:30
पहिल्यांदा काश्मीर आणि आता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात गरळ ओकत आहेत.
नवी दिल्लीः पहिल्यांदा काश्मीर आणि आता नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी भारताविरोधात गरळ ओकत आहेत. भारतानंही आता मलेशियाला धडा शिकवण्यासाठी पाम ऑइलच्या आयातीवर प्रतिबंध घातला होता, आता तोच बंदीचा काळ आणखी वाढवण्याचं भारतानं ठरवलं आहे. केंद्र सरकार मलेशियातून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्सही बॅन करण्याच्या तयारीत आहे.
काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यांसारख्या अंतर्गत प्रश्नात मलेशियाच्या पंतप्रधानांना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. दुसरीकडे महातीर मोहम्मद यांनीही भारताच्या अंतर्गत विषयासंदर्भात बोलतच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मलेशियाहून आयात होणाऱ्या मायक्रो प्रोसेसर्स चिपवर भारतात तांत्रिक कारणास्तव बंदी घातली जाऊ शकते. या चिपचा उपयोग दूरसंचार साधने तयार करण्यासाठी होतो.
''कुठे काही चुकीचं होत असल्यास बोलावं लागेल''
भारतानं आमच्या आयातीवर घातलेल्या प्रतिबंधावर मी चिंतीत आहे. परंतु चुकीच्या गोष्टींसंदर्भात मी कायमच बोलत राहणार आहे. भारतानं आमच्या पाम ऑइलवर बंदी घातली आहे, त्यामुळेच आम्ही चिंतीत आहोत, कारण भारत आमचा बाजारातील मोठा ग्राहक आहे, परंतु आपल्याला या गोष्टींवर नजर ठेवावी लागणार आहे, असंही मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतानं आमच्या तेल आयातीवर बंदी घातल्यानं मलेशिया बाजारातही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.
जाकीर नाईकसंबंधी मलेशियाच्या भूमिकेवर भारत नाराज
नागरिकत्व कायदा आणि काश्मीरच्या मुद्द्यांवर महातीर यांनी केलेल्या वक्तव्याशिवाय जाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून मलेशियाच्या भूमिकेवरही भारत नाराज आहे. भारताचा मलेशियाबरोबर 17 अब्ज डॉलरचा व्यापार संबंध आहे. यात 6.4 अब्ज डॉलरची निर्यात आणि 10.8 अब्ज डॉलरच्या आयातीचा समावेश आहे.