नवी दिल्लीला मिळणार अमेरिकेचं 'रक्षा कवच', जवळपासही फिरकणार नाही शत्रूंची मिसाइल अन् ड्रोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 11:22 AM2019-06-10T11:22:36+5:302019-06-10T11:25:25+5:30
वॉशिंग्टन आणि मॉस्कोसारखेच केंद्रातलं मोदी सरकार देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला अभेद्य अशी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
नवी दिल्लीः वॉशिंग्टन आणि मॉस्कोसारखेच केंद्रातलं मोदी सरकार देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला अभेद्य अशी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठीच भारत अमेरिकेकडून नॅशनल एडवान्स्ड सरफेस टू एअर मिसाइल सिस्टीम- II (NASAMS-II) खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम राजधानी दिल्लीचं संरक्षण करणार आहे. ही सिस्टीम दिल्लीत तैनात केल्यानंतर शत्रूला मिसाइल, ड्रोन आणि विमानानं हल्ला करणं शक्य होणार नाही. जरी हल्ला झाला, तरीही तो या यंत्रणेच्या माध्यमातून लागलीच निष्क्रिय करता येणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं दिल्लीच्या चारही बाजूंना एअर मिसाइल सिस्टीमच्या कवचाचं संरक्षण पुरवण्याचं निश्चित केलं आहे. डीआरडीओ स्वतःची बॅलिस्टिक मिसाइल संरक्षण(BMD) प्रणाली विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच NASAMS ही एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम अमेरिकेकडून घेण्यासाठी भारतानं ठरवलं आहे. याचा देशातीच राजधानी असलेल्या दिल्लीला मोठा फायदा होणार असून, ती सुरक्षित केली जाणार आहे. बॅलिस्टिक मिसाइल संरक्षण(BMD) प्रणालीच्या माध्यमातून पृथ्वीच्या वायुमंडळ आणि बाहेरून मिसाइलचं आक्रमण झाल्यास ट्रॅक सिस्टीमच्या माध्यमातून ती नष्ट करता येणार आहे. अमेरिकेकडून घेण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक प्रणालीमुळे 9/11 सारख्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करता येणार आहे. NASAMSची हवेत मारा करून शत्रूच्या मिसाइलला टार्गेट करण्याची क्षमता जबरदस्त आहे.
तसेच या यंत्रणेमध्ये बंदूक प्रणालीचाही अंतर्भाव करण्यात आल्यानं ही एक अत्याधुनिक प्रणाली समजली जाते. इमारतीच्या जवळूनही या प्रणालीच्या माध्यमातून शत्रूवर निशाणा साधता येऊ शकतो. NASAMS-IIमुळे जुनी सुरक्षा व्यवस्था बदलून अत्याधुनिक होणार आहे. मोदी सरकारच्या तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील डीएसहीनं अमेरिकेकडून 1 अब्ज डॉलरमध्ये 'नॅशनल एडवांस्ड सर्फेस-टू-एयर मिसाइल सिस्टम-2' खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली होती. अमेरिकेकडून घेण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक प्रणालीतून राष्ट्रपती भवन, संसद, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकला सुरक्षा देण्यात येणार आहे.