महिला संचालकांत जगात भारताचे स्थान २६ व्या क्रमांकावर
By admin | Published: March 8, 2016 02:35 AM2016-03-08T02:35:09+5:302016-03-08T02:35:09+5:30
विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे.
नवी दिल्ली : विविध क्षेत्रात महिला उच्चपदे भूषवीत असताना भारतीय कंपन्यांत मात्र उच्चपदावरील महिलांची संख्या आजही कमी आहे. कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांचे प्रमाण पाहिले, तर ७ .० टक्क्यांसह भारत २६ व्या क्रमांकावर आहे, तर नॉर्वे ४० टक्के प्रमाणासह पहिल्या स्थानी आहे. माय हायरिंग क्लब डॉट कॉम आणि जॉब पोर्टल डॉट को डाट इनच्या ‘संचालक मंडळात महिला’ सर्वेक्षणानुसार भारतीय कंपन्यांतील संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. भारताने वरिष्ठ व्यवस्थापन पदावर महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळात महिला सदस्यांची संख्या अत्यंत कमी आहे. विकसित देशांच्या एकूण सरासरीच्या तुलनेत कमी आहे, असे राजेश कुमार यांनी सांगितले. या सर्वेक्षणात जगभरातील एकूण ३८,३१३ नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला, तर भारतातील १,४५९ नोंदणीकृत कंपन्याचा सहभाग घेतला.
४० टक्के प्रमाणाने नॉर्वे पहिल्या स्थानी
भारतातील नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळातील महिला संचालकांची एकूण टक्केवारी ६.९१ टक्के असून मागच्या वर्षी हे प्रमाण ६.६९ टक्के होते. नॉर्वेत संचालक मंडळात महिला सदस्यांचे प्रमाण ४०.१२ टक्के असून या बाबतीत नॉर्वे जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर स्वीडन (२९.३१ टक्के), फिनलँड (२५.८९ टक्के), दक्षिण आफ्रिका (१८.३१ टक्के) आणि अमेरिकेचा (१७.३७ टक्के) क्रमांक लागतो.
जागतिक पातळीवर महिला संचालकांचा कार्यकाळ २ वर्षे आहे. भारतात मात्र हा कालावधी फक्त एक वर्ष आहे. भारतीय उद्योग क्षेत्रानेही महिला संचालकांचा कार्यकाळ वाढविण्याच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे यात सुचित केले.