Global Hunger Index 2022: ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची स्थिती बिकट; पाकिस्तान, श्रीलंकाही पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:36 PM2022-10-15T14:36:32+5:302022-10-15T14:36:59+5:30
ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 डेटामध्ये भारत सहा स्थानांनी घसरला असून 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आला आहे.
जागतिक स्तरावर भारतासाठी चांगली बातमी नाही. ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 डेटामध्ये भारत सहा स्थानांनी घसरला असून 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर आला आहे. जागतिक यादीत दक्षिण आशियाई देशांपैकी भारत केवळ अफगाणिस्तानपेक्षा सरस आहे. आर्थिक संकट आणि उपासमारीचा सामना करत असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश भारताच्या तुलनेत थोडे सुस्थितीत आहेत.
केवळ तालिबान शासित अफगाणिस्तान हा असा एकमेव दक्षिण आशियाई देश आहे ज्याला भारतापेक्षा खालचं स्थान देण्यात आलेय. यापूर्वीही 2021 मध्ये भारताची क्रमवारी चांगली नव्हती. त्यावेळी सरकारने हे आकडे फेटाळले होते.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2022 च्या 121 देशांच्या यादीत भारत 107 व्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी 2021 मध्ये भारताला 101 वा क्रमांक देण्यात आला होता. शेजारील देशांबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार यांना अनुक्रमे 99, 64, 84, 81 आणि 71 वे स्थान मिळाले आहे. पाच पेक्षा कमी स्कोअर असलेले 17 देश एकत्रितपणे 1 आणि 17 क्रमांकादरम्यान आहेत.
भारताकडून तुर्तास प्रतिक्रिया नाही
तुर्तास या यादीवर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, विनाशकारी पुरानंतर भीषण महागाई आणि उपासमारीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची स्थिती भारताच्या तुलनेत चांगली असल्याचे दिसून येत आहे, हे आश्चर्यकारक आहे. पाकिस्तानातील पुरामुळे एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला होता. लाखो लोक बेघर झाले. लाखो लोकांचा मृत्यूही झाला होता. इतकंच नाही तर पाकिस्ताननं जगाकडून अन्नधान्यासाठी मदतही मागितली होती. भारतानंतर या यादीत झांबिया, अफगाणिस्तान, तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन, लेसोथो, लायबेरिया, नायजर, हैती, चाड, डेम यांसारख्या देशांचा समावेश आहे.