भूक निर्देशांकात ११७ देशांत भारत घसरून १0२ व्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:35 AM2019-10-17T04:35:08+5:302019-10-17T04:36:01+5:30
भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात.
नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असताना जागतिक भूक निर्देशांकातही (हंगर इंडेक्स) मध्येही भारताची मोठी घसरण झाली आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ११७ देशांच्या यादीत भारत १0२ व्या स्थानी गेला आहे. दक्षिण आशियाई देशांत भारत सर्वात तळाला आहे. नेपाळ, बांग्लादेश व पाकिस्तान हेही भारतापेक्षा वरच्या स्थानी आहे. म्हणजेच तेथील स्थिती भारतापेक्षा चांगली आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) गटातील देशांतही भारत खूपच मागे आहे. या इंडेक्समध्ये २0१५ साली भारत ९३ व्या स्थानावर होता. भारत यंदा १0२ व्या स्थानी गेला असताना पाकिस्तान मात्र ९४ व्या स्थानावर पोहोचला आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करताना २0१४ ते २0१८ या काळातील माहिती एकत्र करण्यात आली होती. त्यानुसार क्रम ठरविला गेला.
या माहितीमध्ये ११७ देशांतील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या आणि याच वयोगटातील मुलांचा मृत्युदर यांचा समावेश होता.
या क्रमवारीत नेपाळने खूपच प्रगती केली आहे, तर ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत खूप मागे पडल्याने दक्षिण आफ्रिकेतील देशांपेक्षा दक्षिणआशियाई
देशही मागे पडले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, भारतात ६ ते २३ महिने या वयोगटातील केवळ ९.६ टक्के बालकांनाच योग्य आहार मिळतो.
कसा ठरतो निर्देशांक?
भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते १00 असे गुण दिले जातात. ज्या देशाचे गुण 0 आहेत, तो या निर्देशांकात सर्वात वर असतो. म्हणजेच शून्य गुण सर्वोत्तम असतात आणि तेथील देशात भुकेचा प्रश्न नाही, असे मानले जाते. तसेच १0 पेक्षा कमी गुण असलेल्या देशांत भुकेची स्थिती गंभीर नाही, असे मानले जाते.
२0 ते ३४.९ गुण मिळण्याचा अर्थ त्या देशात भुकेची स्थिती गंभीर आहे. जिथे भुकेचा प्रश्न हे आव्हान आहे, त्यांना ३५ ते ४९.४ गुण मिळतात, तर ५0 वा त्यापेक्षा जास्त गुण असल्यास तिथे भुकेची स्थिती भयावह आहे, असे मानले जाते.