कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत भारत जगात तिसरा, रुग्णसंख्या 7 लाखांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 10:32 AM2020-07-06T10:32:30+5:302020-07-06T10:36:25+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवसात देशात तब्बल 24,248 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, देशातील रुग्णसंख्येचा आकडा 7 लाखांच्या घरात पोहोचला असून कोरोनामुळे सर्वाधिक बाधित होणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पुढे आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 19,693 पर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या 4 दिवसात सातत्याने 20 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आल्याने कोरोना आणखीनच चिंताग्रस्त बनत चालला आहे. मात्र, दिलासादायक वृत्त म्हणजे आत्तापर्यंत 4 लाख 24 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या चार राज्यांत कोरोनातून बरे होण्याच्या दरात (रिकव्हरी रेट) दिल्ली सगळ्यात वेगाने प्रगती करत आहे. गेल्या दोन आठवड्यांत दिल्लीत हा दर २७ टक्क्यांनी वाढला आहे. या दरम्यान महाराष्ट्रात रुग्ण बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास ८ टक्क्यांनी वाढली. परंतु, तमिलनाडू आणि गुजरातमध्ये हा दर २ टक्क्यांपेक्षा काहीसा वाढला आहे.
कोविड 19 च्या सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून ब्राझील व रशियानंतर भारत चौथ्या स्थानावर होता. मात्र, गेल्या आठवड्यातील रुग्णवाढीचा वेग वाढल्याने रशियापेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या भारतात झाली आहे. दरम्यान, वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक आणि आसाम या राज्यांनी काही जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित केले आहे.