कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारत सज्ज- संरक्षणमंत्री राजनाथसिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 05:21 AM2019-12-05T05:21:56+5:302019-12-05T05:25:01+5:30
अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती.
नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये सीमातंट्यासह आणखी काही मुद्यांवर मतभेद आहेत, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे चीनचे जवान भारतीय हद्दीत आणि भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत जाण्याचे प्रकार घडतात. ती प्रत्यक्ष घुसखोरी नसते. मात्र, भारताची सैन्यदले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या देशाच्या सीमा अत्यंत सुरक्षित आहेत, असे संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.
अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती. सतर्क असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला पिटाळून लावले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, सीमेच्या अगदी जवळच्या भागात चिनी लष्कराप्रमाणेच भारतीय सैन्यातले जवानही गस्त घालत असतात. डोकलाम येथे चीनने वाहनयोग्य रस्ता बांधायला घेतल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी जून २०१७ मध्ये जोरदार आक्षेप घेतला होता.
मोठा भूभाग बळकावला
१९६७ साली सिक्कीमच्या नथू ला खिंडीत घडलेली चकमक वगळता भारत व चीनने त्यानंतर परिस्थिती फार चिघळणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. चीन अधूनमधून कुरापती काढत असतो.
भारताला शत्रू मानणाºया पाकिस्तानला आर्थिक मदत करून चीनने त्यालाही वश करून घेतले आहे.
राजनाथसिंह म्हणाले की, भारत व चीन आपसातील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करतील. १९६२ साली चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.