आव्हानांचा सामना करण्यास भारत सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:05 AM2017-08-16T04:05:56+5:302017-08-16T04:05:58+5:30
चीनसोबत डोकलामवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले
नवी दिल्ली : चीनसोबत डोकलामवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान पुढे म्हणाले की, आव्हान समुद्री भागातून असो अथवा सीमेवरून, भारत सर्व आव्हानांशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी चीनचा उल्लेख न करता हा इशारा दिला.
देशाची सुरक्षा आपल्या सरकारची प्राथमिकता असून, सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी जवानांना तैनात करण्यात आल्याचे सांगितले. नोटाबंदीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. यात १ लाख लोकांनी करचुकवेगिरी करून हा पैसा दडवला होता, असे ते म्हणाले.
नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. देशातील ३ लाख कंपन्या अशा आहेत, ज्यांचे काळा बाजार, हवाला रॅकेट आदींच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे ठोकल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
>भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
तीन वर्षांत सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. एप्रिल ते ५ आॅगस्ट २०१७पर्यंत ५६ लाख नवीन लोकांनी कर परतावा दाखल केला असून, वर्षभरापूर्वी ही संख्या २२ लाख एवढी होती. कधीच आयकर भरला नव्हता अशा १ लाख लोकांनी कर भरला. नोटाबंदीनंतर ३ लाख कोटी रुपये बँकिंग व्यवस्थेत आले. नोटाबंदीनंतर हवाल्याचे काम करणाºया ३ लाख कंपन्या सापडल्या. यातील पावणे दोन लाख कंपन्या रद्द केल्या आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी ‘भारत छोडो’चा नारा होता आता ‘भारत जोडो’चा नारा आहे. आपण सर्वांनी मिळून असा भारत घडवू या जिथे गरिबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल. जिथे देशातील शेतकरी काळजीत नव्हे, तर शांततेने झोपेल. तरुण आणि महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी मिळेल. आपण असा भारत निर्माण करू या जो दहशतवाद, सांप्रदायिकता आणि जातीयवादापासून मुक्त असेल.
सामूहिक शक्ती, एकीचे बळ ही आपली ताकद आहे. १९४२ ते १९४७दरम्यान देशाने सामूहिक शक्तिप्रदर्शन केले. पुढील ५ वर्षे याच सामूहिक शक्ती, बांधिलकी व मेहनतीसोबत देशाला पुढे न्यायचे आहे. न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि भारताचा सर्व जगभरात दबदबा असणारा असा असेल.
>गोरखपूर प्रकरणी व्यक्त केला शोक
गोरखपूरच्या बीआरडी रुग्णालयात ६५हून अधिक मुलांचा मृत्यू झाला. याचादेखील उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला. या मुलांचा मृत्यू व काहींचा नैसर्गिक आपत्तीत जीव गेला. याचे दु:ख असून, देश या मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे, असे या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
>डाळ खरेदीचा इतिहास
सरकारमध्ये डाळ खरेदी करण्याची प्रथा कधीच नव्हती. या वर्षी १६ लाख टन डाळ खरेदी केली. सरकारने शेतकºयांना प्रोत्साहन दिले आणि
१६ लाख टन डाळ खरेदी करून इतिहास रचला.
शेतीच्या पाण्यासाठी ९९ योजना
मातीतून सोने पिकवण्याची धमक माझ्या शेतकºयांमध्ये आहे. पण त्यांना फक्त पुरेसं पाणी पाहिजे. शेतीसाठी आम्ही ९९ योजना आणल्या. त्यापैकी २१ योजना सुरू झाल्या आहेत.
५० योजना लवकरच पूर्ण होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ट्रिपल तलाकविरोधात आंदोलन
ट्रिपल तलाकविरोधात महिलांनी देशात आंदोलन उभारले आहे. या महिलांचे अभिनंदन करतो. त्यांना पाहिजे ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
>‘नोटाबंदीनंतर ३ लाख कंपन्यांचं हवाला
रॅकेट उद्ध्वस्त’
गेल्या तीन वर्षांत सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला. यात १ लाख लोकांनी करचुकवेगिरी करून हा पैसा दडवला होता. तसेच नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. देशातील ३ लाख कंपन्या अशा आहेत, ज्यांचे काळा बाजार, हवाला रॅकेट आदींच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोन लाख कंपन्यांना टाळे ठोकल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
>तरुणांना आवाहन
२१व्या शतकात जन्म घेणाºयांसाठी २०१८ हे वर्ष निर्णायक असेल. युवकांनो, देशाच्या विकासात योगदान द्या, देश तुम्हाला निमंत्रित करतोय.
तरुणांना देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे भाग्य मिळतेय. २१व्या शतकात जन्मलेल्या तरुणांसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. तरुणांनो, देशाच्या विकासासाठी पुढे या.
>लंडनमध्ये ‘फ्रीडम रन’
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लंडनमध्ये पहिल्यांदाच ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात आले होते. ही दौड ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वायर येथून सुरू झाली. येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून ते लंडनस्थित भारतीय दूतावासापर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत शेकडो प्रवासी धावले. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त वाय. के. सिंग यांनी चहा आणि समोसे देऊन सर्वांचे स्वागत केले. आम्हाला भारतीय स्वातंत्र्यानिमित्त प्रतीकात्मक असे काहीतरी करायचे होते त्यासाठीच ही दौड आयोजित केल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
>पुराच्या पाण्यात उभे राहत दिली तिरंग्याला सलामी
मंगळवारी एकीकडे राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे पूर्वोत्तर राज्यात पुराने वेढा घातला असताना पुराच्या पाण्यात उभे राहत नागरिकांनी झेंडावंदन केले. पुराने वेढलेल्या आसाममध्ये सगळीकडे पाणी साचलेले असल्याने थेट छतावरच ध्यजवंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. एवढेच नाही, तर उपस्थितांनी कंबरेएवढ्या पाण्यात उभे राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. आसाममधील मारीगाव जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी भरले होते. पण ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपली सुरक्षा धोक्यात घातली. काही ठिकाणी शाळेच्या छतावर ध्वजवंदन करण्यात आले, तर काही ठिकाणी होडीत बसून शाळेत येत मुलांनी ध्वजवंदन केले.
>हिंसाचार खपवून घेणार नाही
हा देश बुद्धांचा आहे, गांधींचा आहे. येथे आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले. तसेच चालतेय, चालू द्या, हा काळ आता गेला आहे. आता देश बदलतोय, बदल दिसतोय, असे ते म्हणाले. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता
३० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत ३४ टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटी रुपयेही वाचले आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.